‘सिक्सर किंग’ होण्यापासून फक्त एक पाऊल दूर, रोहित शर्मा रचणार इतिहास? 

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. रोहितने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक जरी षटकार मारला तरी तो टी-20 फॉरमॅटचा सिक्सर किंग बनणार आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत 137 T20 सामन्यांमध्ये 172 षटकार मारले आहेत, तो न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या बरोबरीत आहे, गप्टिलच्या नावावरही तितकेच षटकार आहेत. जर रोहितने आज एक षटकार मारला तर तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर करेल. टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल नंतर 79 सामन्यात 124 षटकार मारणाऱ्या रोहित आणि गप्टिलचा क्रमांक लागतो. त्याचवेळी इयॉन मॉर्गन (120) चौथ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच (118) पाचव्या क्रमांकावर आहे.

टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही रोहित शर्माचे राज्य आहे. रोहितच्या नावावर T20I मध्ये 3,631 धावा आहेत आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या खालोखाल हिंदुस्थानचा माजी कर्णधार विराट कोहली आहे, ज्याने 97 सामन्यात 3586 धावा केल्या आहेत. त्याचवेळी मार्टिन गुप्टिल 3497 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला जाणारा दुसरा सामना हिंदुस्थानसाठी करो वा मरो असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थान 0-1 ने पिछाडीवर आहे.