
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली.
कोण आहेत न्यायमूर्ती चंद्रशेखर?
न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचा जन्म २५ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी सन १९९३ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर येथून एल.एल.बी. पदवी प्राप्त केली आणि ९ डिसेंबर १९९३ रोजी दिल्ली राज्य बार कौन्सिलमध्ये वकिली व्यवसायासाठी नोंदणी केली. दिल्ली येथे त्यांनी फौजदारी तसेच दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये वकिलीला सुरुवात केली. १९ वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी विविध न्यायालयांमध्ये सुमारे ३५०० खटले लढविले, ज्यांपैकी बहुतेक सर्वोच्च न्यायालयात होते.
सर्वोच्च न्यायालयातील १४० निवाडे अहवालित झाले असून त्यामध्ये ते वकील म्हणून उपस्थित होते. त्यांनी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) आणि झारखंड राज्य यांचे सर्वोच्च न्यायालयात स्थायी वकील म्हणून काम केले. तसेच बिहार राज्य गृहनिर्माण मंडळ, बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, झारखंड राज्य वीज मंडळ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि इतर अनेक महामंडळे, संस्था यांचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ते काही खासगी कंपन्यांचे कायमस्वरूपी वकील होते.
त्यांची नियुक्ती १७ जानेवारी २०१३ रोजी झारखंड उच्च न्यायालय, रांची येथे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली आणि २७ जून २०१४ रोजी झारखंड उच्च न्यायालय, रांची येथे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून करण्यात आली. त्यांनी २९ डिसेंबर २०२३ ते ४ जुलै २०२४ या कालावधीत झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
त्यानंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला.