
न्यायमूर्ती सूर्य कांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश बनले आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर सोमवारी न्या. सूर्य कांत यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भूतान, मलेशिया, नेपाळ, केनिया, मॉरिशस श्रीलंका आणि ब्राझिल या सात देशांचे मुख्य न्यायाधीश कुटुंबियांसह उपस्थित होते.
15 महिन्यांचा कार्यकाळ
दरम्यान, सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्य कांत यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ राहणार आहे. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील.
Delhi: Justice Surya Kant takes oath as the Chief Justice of India, at Rashtrapati Bhavan. President Droupadi Murmu administers the oath to him.
(Pics: DD News) pic.twitter.com/aOSQZx8SzA
— ANI (@ANI) November 24, 2025
कोण आहेत नवे सरन्यायाधीश?
न्या. सूर्य कांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरयाणातील हिसार येथे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1984 मध्ये एका छोटय़ा शहरात वकिली सुरू केल्यापासून देशाचे सरन्यायाधीश होईपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी राहिलेला आहे. राष्ट्रीय आणि घटनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक निकालांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे.

























































