
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्य कांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश बनले आहेत. त्यांची सीजेआय म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते येत्या 24 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील, अशी माहिती कायदा मंत्रालयाने दिली आहे. विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई हे 23 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होतात. न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा कार्यकाळ अंदाजे 14 महिन्यांचा असेल. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अनेक घटनात्मक खंडपीठांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्याच्या बाबींचा समावेश असलेले 1000 हून अधिक निर्णय दिले. त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांमध्ये 2023 मध्ये कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनसह सर्व बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्याचे श्रेयदेखील न्यायमूर्ती सूर्य कांत यांना जाते. बेकायदेशीर पाळत ठेवण्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सायबर तज्ञांचे एक पॅनेल स्थापन करणाऱ्या पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा ते एक भाग होते. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी बिहारमधील मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख नावांची माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते.




























































