म्युच्युअल फंडला डिमॅट अकाऊंट जोडल्यास…

 >> जुझर गबाजीवाला, संचालक, व्हेंचुरा सिक्युरिटीज

जीवन अनिश्चित आहे असे आपण अनेकदा ऐकत असतो. कधी ना कधी कुठल्या तरी धक्कादायक घटनेने या वास्तवाची जाणीव करून दिली जाते. त्यातून कुटुंबातील कमावणाऱया प्रमुख व्यक्तीचे अचानक निधन झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीसाठी खूप धावपळ करावी लागते. म्युच्युअल फंड युनिट्स जर डिमॅट स्वरूपात बदलल्यास कुटुंबाला कमी त्रास होईल.

म्युच्युअल फंड हे सध्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे साधन आहेत. पण युनिटधारकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नामनिर्देशन केलेल्या (नॉमिनी) व्यक्तींना गुंतवणूक हस्तांतरित करताना अनेक आव्हाने येतात.
सध्याच्या काळात नियमातील बदल तसेच तंत्रज्ञानामुळे म्युच्युअल फंड युनिट्सची खरेदी आणि विक्री करणे शक्य झाले आहे. तुमची म्युच्युअल फंड युनिट्स जर डीमॅट स्वरूपात रूपांतरित केल्यास संकट काळातही गुंतवणूक हस्तांतरणाचा त्रास कमी होईल.

म्युच्युअल फंड युनिट्सचे डिमटेरिअलायझेशन त्याच्या स्वतःच्या अटी आणि शर्तीनुसार येत असल्याने, आपापल्या गरजांनुसार म्युच्युअल फंड होल्डिंगसाठी डिमॅट खाते ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो. तुम्ही डिमटेरिअलायझेशन करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला तुमच्या डीपीकडून कन्व्हर्जन रिक्वेस्ट अर्ज घ्यावा लागेल. तपशील भरून तो ब्रोकरला सादर करा.
साधारणपणे, गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक लिक्विड फंडातून इक्विटी योजनांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी ही यंत्रणा वापरतात. तुम्ही फक्त युनिट्सची संख्या सूचित करू शकत असल्याने, तुम्ही प्रत्येक वेळी इक्विटी योजनांमध्ये रक्कम हस्तांतरित करू शकता.

नॉमिनी – हे फायदेशीर आणि हानीकारक दोन्ही असू शकते. आजपर्यंत, तुमच्या डिमॅट खात्यात 3 नॉमिनी असू शकतात. परंतु जर तुम्हाला वेगवेगळ्या खात्यांसाठी किंवा पहलिओसाठी वेगवेगळे नॉमिनी हवे असतील, तर तसे करणे शक्य नाही.

तोटे कोणते?

रिडम्पशन – म्युच्युअल फंड डीमॅट स्वरूपात असतात, तेव्हा तुम्ही गुंतवणुकीची पूर्तता फक्त युनिट्सद्वारे करू शकाल, रक्कम म्हणून नाही. यामुळे, तुम्ही आवश्यक असलेली रक्कम रिडीम करू शकणार नाही. तुम्ही रिडीम करण्यासाठी सांगितलेल्या युनिटच्या आधारावर तुम्हाला एकतर जास्त किंवा कमी रक्कम मिळेल.

एसडब्ल्यूपी – एसडब्ल्यूपी किंवा सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन हा एक पर्याय आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कॉर्पसमधून ठराविक रक्कम महिन्याला काढतो. जर गुंतवणूक डिमॅट खात्यात असेल, तर एसडब्ल्यूपी युनिट्समध्ये करावे लागेल आणि यामुळे प्रत्येक वेळी पैसे काढले जातील. एसटीपी किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या बाबतीतही असेच आहे.

फायदे कोणते?
मालमत्ता नियोजन सोपे होते – सर्व गुंतवणूक डिमॅट खात्यात ठेवली जात असल्याने, यामुळे मालमत्ता नियोजन प्रक्रिया खरोखरच सोपी होते; तुम्हाला फक्त मृत्युपत्रात डीमॅट खाते क्रमांक नमूद करायचा आहे.
नामांकन – डिमॅट खात्यात अखंडपणे, निवडीच्या प्रमाणात संपत्ती मिळू शकेल, अशा तुम्ही तीन लोकांपर्यंत नामनिर्देशन करू शकता.
सुलभता – आजच्या युगात, सुविधादेखील खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तुमची सर्व गुंतवणूक समभागापासून ते म्युच्युअल फंडांपर्यंत एकाच ठिकाणी पाहू शकाल. एकापेक्षा जास्त खाती सांभाळण्याची कोणतीही अडचण नाही. याशिवाय तुमचे कुटुंब कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीनंतर सर्व माहिती सहजतेने प्राप्त करण्यास सक्षम असेल.
अडथळामुक्त – उद्या जर तुम्हाला बँक खाते, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता किंवा नामांकन बदलायचे असेल तर तुम्हाला फक्त एक संदेश डिमॅट खात्यावर पाठवावा लागेल जिथे सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी ठेवली जाते.
शून्य खर्च – काही ब्रोकिंग हाऊसने डीमॅट खात्यांवर वार्षिक देखभाल शुल्क शून्य आकारायला सुरुवात केली आहे.