
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी तयारी करीत असलेला उत्तर प्रदेशातील खुर्ज येथील कबड्डीपटू ब्रिजेश सोलंकी यांचा रेबीजची लागण झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ब्रिजेश हा फाराना गावचा रहिवासी होता. प्रो कबड्डी लीगमध्ये निवड होण्यासाठी तो कसून तयारी करत होता.
ब्रिजेशचे चुलत भाऊ शिवम याने म्हटले की, ब्रिजेशने मार्चमध्ये गावातील नाल्यात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाहेर काढले. त्यावेळी या पिलाने त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. ब्रिजेश यांनी साधारण जखम समजून त्याकडे दुर्लक्ष केले आणि रेबीजची लस घेतली नाही. तो कबड्डीची तयारी करत राहिला व स्पर्धांमध्ये खेळत राहिला. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर ब्रिजेशच्या उजव्या हात बधिर झाला. त्याला थंडी जाणवू लागली. दुपारपर्यंत तर त्याचे संपूर्ण शरीर सुन्न झालं.
प्रथम ब्रिजेश यांना अलिगड जिल्ह्यातील ‘जीवन ज्योती हॉस्पिटल’ला नेण्यात आले. तेथून त्याला उपचारासाठी मोठय़ा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे ब्रिजेशमध्ये रेबीजची लक्षणे दिसल्याने उपचारास नकार मिळाला. नंतर त्याला मथुरेतील आयुर्वेदिक औषध केंद्रात नेलं. तेथील उपचारानंतर ब्रिजेशच्या प्रकृतीत फरक पडला, मात्र नंतर त्याची प्रकृती पुन्हा ढासळली. मग त्याला तातडीने दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टर्सनी रेबीज असल्याचं पाहून आता खूप उशीर झाल्याचे सांगितले. मग ब्रिजेशला कुटुंबीय गावाकडे घेऊन जात असताना प्रवासातच ब्रिजेशने अखेरचा श्वास घेतला.