काबूल विमानतळाजवळ दोन आत्मघातकी स्फोट, लहान मुलांसह 60 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबानने कब्जा मिळविल्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच अफगाणिस्तानात भयंकर रक्तपाताला सुरुवात झाली असून काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच दोन आत्मघाती हल्ले झाले. यात किमान 60 जण ठार तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट एवढे भीषण होते की, अनेकांच्या शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या. मृतांमध्ये अमेरिकच्या किमान चार कमांडोंजचाही समावेश आहे. अफगाणिस्तान सोडण्याकरिता विमानतळ आणि परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असतानाच धमाके झाल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. या आत्मघाती हल्ल्यामागे ‘इसिस’चा हात असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या हल्ल्यापूर्वी काबूल विमानतळावर इटलीच्या एका विमानावर गोळीबार करण्यात आला.

तालिबानने कब्जा मिळविल्यापासून काबूलच्या हमीद करझाई विमानतळावर गेल्या बारा दिवसांपासून हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिक देश सोडून अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये जात आहेत. त्यात महिला आणि लहान मुलांचीही संख्या मोठी आहे. तसेच अमेरिकेसह इतर बहुतांशी देशांनी आपले दूतावास बंद करून आपल्या नागरिकांचे आणि सैनिकांचे एअरलिफ्ट सुरू केले आहे. जगातील सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम सुरू असतानाच भयंकर हल्ले झाले आणि किमान 60 जण ठार झाल्याचे रात्री उशिराचे वृत्त आहे.

भीती खरी ठरली; ‘इसिस’चा हात

जगातील सर्वात मोठय़ा ‘एअरलिफ्ट’ मोहिमेत अडथळा आणण्यासाठी दहशतवादी हल्ले होण्याची भीती अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आदी देशांनी व्यक्त केली होती. त्यासाठी विमानतळांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला तरीही आत्मघाती स्फोट होऊन रक्तपात झाला.

हे स्फोट इसिस अर्थात इस्लामिक स्टेटच्या खोरासन या दहशतवादी गटाकडून करण्यात आल्याची शक्यता आहे. इसिसचे दहशतवादी मोठय़ा संख्येने अफगाणिस्तानात घुसले आहेत. त्यांनीच हा स्फोट घडविल्याचा संशय अमेरिकेनेही व्यक्त केला आहे.

विमानतळावर येऊ नका; अनेक देशांचे नागरिकांना अवाहन

काबूलमधील स्फोटांमुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीने आपत्कालीन बैठक घेतली. काबूलमध्ये अडकलेल्या नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळावर येऊ नये असे अवाहन अनेक देशांनी आपल्या राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना केले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तालिबानने अमेरिकेला इशारा देताना 31 ऑगस्टची डेडलाइन पाळा, नाहीतर परिणाम वाईट होतील असे म्हटले होते. मात्र या धमकीचा आणि स्फोटांचा संबंध नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे.

गोळीबार करीत दहशतवादी घुसला

काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावर ऐबी गेटच्या बाहेर एक दहशतवादी बेछूट गोळीबार करीत आला आणि स्वतःला स्फोटकांनी उडवले. यावेळी गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते, तर दुसरा आत्मघाती स्फोट विमानतळाबाहेरील हॉटेलबाहेर झाला. अमेरिका आणि नाटो देशांचे सैनिक तैनात होते. सैनिकांना टार्गेट करण्यासाठीच हे स्फोट झाल्याचे अमेरिकेच्या पेंटॉगनने म्हटले आहे. पेंटॉगनचे प्रवक्ते जॉन कि-बे यांनी हल्ले भयंकर असल्याचे म्हटले.

आक्रोश, अफरातफरी, चेंगराचेंगरी, दहशत

आत्मघाती स्फोटांमुळे काबूल विमानतळावर अफरातफरी माजली. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. रशियाने किमान 20 जण ठार आणि अनेकजण जखमी झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेनेही अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी होती. स्फोट एवढा भीषण होता की, अनेकांचे हात, पाय तुटले. अनेकांच्या शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या. या स्फोटांमध्ये काही अमेरिकन सैनिकही ठार झाल्याची भीती आहे.

डेडलाइनपूर्वीच धमाके

सध्या काबूल विमानतळ अमेरिकन सैनिकांच्या ताब्यात आहे. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचे पूर्ण सैन्य 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानबाहेर पडेल, अशी डेडलाइन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केली होती. मात्र चार दिवसांआधीच आत्मघाती हल्ले झाले. त्यामुळे अमेरिकेका आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.