दिल्लीच्या हुकुमी गोलंदाजाला हैद्राबादने धू.. धू.. धुतले, 3 वर्षांत पहिल्यांदाचा विकेटची झोळी रिकामी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मंगळवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना रंगला. हैद्राबादने ‘करो या मरो’ लढतीत दिल्लीचा 88 धावांनी धुव्वा उडवला. या लढतीत हैद्राबादच्या गोलंदाजानी दमदार कामगिरी केली, मात्र दिल्लीचा वेगवान गोलंदाज आणि ‘पर्पल कॅप’ धारक कागिसो रबाडा याची तुफान धुलाई झाली. यादरम्यान त्याने एक नकोसा विक्रम देखील आपल्या नावे केला.

दुबईत झालेल्या लढतीत हैद्राबादने नाणेफेक गमावला आणि प्रथम फलंदाजी केली. वॉर्नर आणि ऋद्धिमान साहा यांनी 107 धावांची सलामी दिली. वॉर्नरने 66 आणि साहाने 87 धावा केल्या. यानंतर आलेल्या मनीष पांडे यानेही 44 धावा चोपत हैद्राबादला 20 षटकात 2 बाद 219 अशी धावसंख्या रचून दिली.

रबडाची धुलाई

हैद्राबादच्या फलंदाजांनी दिल्लीची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. दिल्लीचा हुकुमी एक्का असणाऱ्या कागिसो रबाडा याला या लढतीत एकही बळी घेता आला नाही. त्याच्या 4 षटकात हैद्राबादच्या फलंदाजांनी तब्बल 54 धावांची लयलूट केली.

26 व्या लढतीत विकेटची झोळी रिकामी

आयपीएल कारकिर्दीत सलग 25 लढतीत किमान 1 बळी घेणाऱ्या रबाडाची झोळी 26 व्या लढतीत मात्र रिकामी राहिली. विशेष म्हणजे याआधी 2 मे, 2017 ला झालेल्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध खेळतानाच त्याला खाली हाताने जावे लागले होते. त्या लढतीत त्याने 4 षटकात 59 धावा दिल्या होत्या.

पर्पल कॅपधारक

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये हैद्राबाद विरुद्धचा सामना वगळता रबाडाची कामगिरी दमदार राहिली आहे..12 लढतीत त्याने 16.86 च्या सरासरीने आतापर्यंत 23 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. सध्या ‘पर्पल कॅप’ रबाडाच्या डोक्यावर असून दिल्लीच्या अजून 2 लढत बाकी आहे. तसेच प्ले ऑफ मध्ये प्रवेश केल्यास रबाडाला आणखी विकेट्स घेण्याची संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या