येत्या 25 ऑगस्टला आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन्ही एकाच दिवशी होणार आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्य़ांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी ‘दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत यासाठी लवकर तोडगा काढावा व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.
”25 ऑगस्ट 2024 रोजी आयबीपीएस आणि एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याने दोन्हीकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नेमकी कोणती द्यावी असा प्रश्न पडला आहे. यावर्षी आयबीपीएस क्लर्क या पदासाठी मोठ्या प्रमाणावर जागा निघाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे. पण त्याच दिवशी राज्यसेवेचीही परीक्षा असल्याने कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. आयबीपीएस क्लर्क परीक्षेसाठी महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. या परीक्षेच्या तारखा लक्षात घेऊन इतर राज्यांतील आयोग त्यांच्या परीक्षांच्या तारखा निश्चित करतात. पण एमपीएससीने मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. मपीएससीने आपला अट्टहास सोडला नाही तर राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारला माझी विनंती आहे की या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत यासाठी लवकर तोडगा काढावा व विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घ्यावा”, असे ट्विट कैलास पाटील यांनी केले आहे.