
हिंदुस्थान व चीनमध्ये 2020 ला झालेल्या डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रेकरूंचा आनंद द्विगुणीत झाला आहे. ही यात्रा 30 जून 2025 पासून सुरू होणार आहे. उत्तराखंडच्या लिपुलेख खिंडीतून चीनच्या तिबेट प्रदेशात असलेल्या कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावापर्यंत ही यात्रा असेल. यात्रेसंदर्भात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये यात्रेच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.
कैलास मानसरोवर यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. पण, ही मानसरोवर यात्रा गेल्या 5 वर्षांपासून बंद होती. कोरोना माहामारीमुळे 2020 मध्ये ही यात्रा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेला रक्तरंजित संघर्ष, तणाव आणि सीमावादामुळे यात्रा पुन्हा सुरू होऊ शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही यात्रा 30 जून रोजी सुरू होणार असून यामध्ये एकूण 250 यात्रेकरू सहभागी होणार आहेत. या यात्रेकरूंची 5 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 50 यात्रेकरू असणार आहेत. ही यात्रा 22 दिवसांची असणार आहे.
कसा असेल यात्रेचा मार्ग
– दिल्लीपासून टनकपूर ( 1 रात्र )
– टनकपूरपासून धारचूला (1 रात्र)
– गुंजी (2 रात्र)
– नाभीढांग (2 रात्र) यांनतर लिपुलेख दर्रेपासून तकलाकोट (चीन)मध्ये प्रवेश
परतीचा मार्ग-
– बुंडी (पिथौरागढ़) 1 रात्र
– चौकोरी 1 रात्र
– अल्मोडा 1 रात्र यानंतर यात्री दिल्लीला रवाना
असा यात्रेचा मार्ग असणार आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रकरूंची आरोग्य चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी आधी दिल्लीत आणि मग गुंजीला केली जाईल. कुमाऊं मंडल विकास निगम (KMVN) हे या संपूर्ण यात्रेचे संचलन करतील.