पेटलेल्या उसाचे अग्नितांडव सुरूच! जळालेला ऊस पाहून महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला ऊस जात नसल्याने हैराण झाला आहे. त्यात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे शॉटसर्किटने आग लागल्याने उसाचे अग्नितांडव थांबण्याचं चिन्ह नाही. भरीस भर म्हणून कळंब तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथील अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे या महिलेचा तणावाखाली येऊन पेटलेल्या उसाची नुकसानभरपाई सहन न झाल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दत्ता माणिकराव पाचपिंडे यांनी त्यांचे चुलते भगवान पाचपिंडे यांचे शेत वाट्याने केले होते. त्या शेतातील तीन एकर ऊस शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे जळाला. सदरील ऊसाचा सर्व खर्च वाटेकऱ्याकडे असल्याने दत्ता पाचपिंडे यांचे अतोनात नुकसान झाले त्यातच चार दिवसापासून कुठल्याही कारखान्याची तोड मिळत नसल्याने ऊस शेतातच उभा होता. यामुळे दत्ता पाचपिंडे यांच्या आई अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे वय (65) या तणावात होत्या. त्यांना रविवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेले असता आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

एकीकडे वर्षभर तळहाताप्रमाणे जोपासलेल्या उसाचे पीक काही तासात उद्ध्वस्त झाले अन होत्याचे नव्हते झाले. डोक्यावरील मायेचे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

ऊस आणखीही उभाच!

भगवान पाचपिंडे यांच्या नावे बिगरसभासद म्हणून नॅचरल शुगरला नोंद दिलेली आहे. परंतु नॅचरल शुगरने ऊसाची प्रचंड उत्पादकता पहाता बिगर सभासदांचा ऊस गाळायचा नाही असे धोरण ठरवले आहे. तसेच येडेश्वरी शुगरचे दत्ता पाचपिंडे हे सभासद आहेत परंतु येडेश्वरी शुगरने मालकतोड करून ऊस गाळपासाठी आणावा यासाठी परवानगी दिली आहे. परंतु आता आई वारल्याने आम्ही ऊस कसा तोडायचा असा प्रश्न दत्ता पाचपिंडे यांच्या पुढे आहे.