50 वर्षांच्या तपश्चर्येचे फळ! कळसूत्री बाहुल्यांची कला जिवंत ठेवणारे कुडाळचे परशुराम गंगावणे

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी कळसूत्री बाहुल्या हातात घेतल्या. नंतर कधी थांबलोच नाही. गाठीला एक पैसा नसायचा. अनेकदा उपाशीपोटी झोपलो. मासे विकले…खूप कष्ट घेतले. पण बाहुल्यांची साथ सोडली नाही. 50 वर्षांची तपश्चर्या अखेर फळाला आली. शेकडो वर्षांची कला जतन करण्यासाठी जिद्दीने संग्रहालय उभारलं. मुलांनी साथ दिली. त्या सगळ्याचं आज सार्थक झाल्यासारखं वाटलं, अशी भावना पद्मश्री सन्मान मिळालेले कलावंत परशुराम गंगावणे यांनी दैनिक ‘सामना’ शी बोलताना व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिह्यातील पुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील परशुराम गंगावणे पाच दशके आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम करत आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या साथीने ते अनेक लोककथांचे सादरीकरण करत आहेत. पद्मश्री जाहीर झाल्याचे समजताच 65 वर्षीय गंगावणे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. मागचा सारा संघर्ष त्यांना आठवला. खूप कठीण परिस्थितीतून इथवर पोचलो. वयाच्या 12 वर्षी मी भजन गायला लागलो. त्यासोबत कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करायचो. एक खेळ करून जेमतेम पैसे मिळायचे. कुटुंबाची ओढाताण व्हायची. आतापर्यंत तीनवेळा अपघात झाल. 20 वर्षांपूर्वी अपघातात एक पाय जायबंदी झाला. मात्र तरीही वडिलोपार्जित कला सोडली नाही… गंगावणे आठवणींचा पट उलगडू लागतात. एकनाथ आणि चेतन ही त्यांची दोन मुले आज बाहुल्यांची, चित्रकथीची परंपरा पुढे नेत आहेत, त्याचा अभिमान गंगावणे यांच्या डोळ्यांत दिसून येतो.

गोठय़ाच्या जागेत उभारले म्युझियम

परशुराम गंगावणे यांनी ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी हे सिंधुदुर्ग जिह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय 3 मे 2006 रोजी सुरू केले. म्युझियम उभारण्यासाठी त्यांनी गुरांच्या गोठय़ाची जागा वापरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिसी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम गंगावणे यांनी केले. म्युझियमच्या आजूबाजूच्या माड, पोफळींच्या झाडांच्या खोडावरसुद्धा राजे महाराजे द्वारपाल स्वागत करणाऱया पुरातन स्त्रियांची चित्रे विविध रंगात रंगविलेली आहेत.

  • कला आंगण संग्रहालयात सिंधुदुर्गातील ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामडय़ाच्या बाहुल्या, पांगुळ बैल, डोना वाद्य, गोंधळ, पोतराज अशा 11लोककलांची मांडणी केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या