कळव्याच्या उघड्या, बोडक्या रेल्वे पुलाचा प्रवाशांना ताप; शेड आणि सरकत्या जिन्यासाठी शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम

न्यू शिवाजीनगर येथून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उंच रेल्वे पूल पार करण्यासाठी रेल्वे प्रवासी आणि नागरिकांची अक्षरशः दमछाक होत आहे. हा पूल चढताना ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास सोसावा लागत आहे. या पुलावर शेड बांधावी आणि त्याला जोडून समांतर सरकता जिना बांधावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरला आहे. कळवावासीयांना न्याय मिळावा यासाठी शिवसैनिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

न्यू शिवाजीनगर परिसरात रेल्वेचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा उंच पूल आहे. या पुलावर छप्पर नसल्याने ऊन, पावसात कळवावासीयांची प्रचंड कुचंबणा होते. पुलावर चढल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी आल्यास भिजतच पूल पार करावा लागतो. उन्हाळ्यात चटके सोसत या उंच पुलावर कळवावासीयांचा घामटा निघतो. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना तर या पुलावरून प्रवास करताना नाकीनऊ येतात. याची गंभीर दखल शिवसेनेने घेतली आहे.

या पुलावर शेड बांधावी आणि पुलाला समांतर सरकते जिने उभारावेत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने यांच्या नेतृत्वाखाली कळवा-मुंब्रा विधानसभा संघटक चंद्रकांत विधाटे व विधानसभा संघटक पुष्पलता भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख मुकुंद ठाकूर, शाखाप्रमुख राजकिरण तळेकर यांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेस कळवावासीयांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर संघटक नमिता सावंत, उपविभागप्रमुख वसंत सुतार, सुभाष वालगुडे हे यावेळी उपस्थित होते. शाखाप्रमुख दिनेश ठाकूर, संतोष बोरावकर, विवेक म्हात्रे, उपशाखाप्रमुख विजय कदम, प्रकाश मोहिते, सागर जगताप, नीलेश पाटील, दत्तात्रय कुंभार, संभाजी घाटगे, अशोक चौगुले, संजय बाबर, मनोहर मोरे व विभागातील शिवसैनिकांनी उपस्थित राहात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.