सरकार राजकारणात मश्गूल.. खाकी वर्दीचा धाक राहिला नाही, कल्याण-डोंबिवलीत कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा; गुंडा-पुंडांचे ‘राज्य’

>> आकाश गायकवाड

कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी चांगलेच डोके वर काढले आहे. हत्या, महिलांवरील अत्याचार, दरोडे, परप्रांतीयांचे मराठी माणसांवरील वाढते हल्ले अशा एक ना अनेक घटनांनी कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवले आहेत. मात्र सरकार राजकारणात मश्गूल असून खाकी वर्दीचाही धाक न राहिल्याने ठाणे ते कल्याण या पट्ट्यात गुंडा-पुंडांचे ‘राज्य’ आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची सुरक्षाच रामभरोसे आहे.

दादागिरीने सर्वसामान्यांची सुरक्षाच रामभरोसे

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून परप्रांतीयांची मुजोरी मुंबई तसेच उपनगरांमध्ये वाढली आहे. पोलीस यंत्रणा अदृश्य हातांच्या दबावाखाली असल्याने मराठी माणसांवर परप्रांतीयांचे हल्ले वाढले आहेत. तसेच गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत आहे. शहरातील अनेक भागांत बिनधास्तपणे अनधिकृत पब, पार्लर, लेट नाईट डान्स बार, अवैध ढाबे, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे बेकायदेशीर स्टॉल्स याठिकाणी तथाकथित भाई आणि गावगुंडांचा उठबस वाढला आहे. काही जण तर हातात शस्त्र घेऊन सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ टाकत दहशत माजवत आहेत. याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या सुरक्षिततेवर होत आहे.

कोळसेवाडी आणि मानपाडा गुन्हेगारांचा अड्डा

कल्याण परिमंडळ तीनमधील कोळसेवाडी आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्याने विकसित झालेल्या भागात परप्रांतीय नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे या भागात रेकॉर्डवरील गुन्हेगार, गावगुंडांनी सध्या आपले प्रस्थ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कल्याण पूर्व, अडिवली-ढोकळी, पिसवली, नेवाळी, नांदिवली, मलंग रोड, द्वारली हा भाग मोठ्या प्रमाणात परप्रांतीय गुन्हेगार सध्या राहण्यास येत आहेत. अशा गुन्हेगारांना रोखण्यात मानपाडा आणि कोळसेवाडी पोलीस ठाणे पूर्णतः अपयशी ठरल्याचे तेथील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमधून दिसून येत आहे.

नराधम विशाल गवळी यानेही बदलला पेहराव

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळी यानेदेखील पोलिसांना चकवा देण्यासाठी आपला लूक बदलला होता. आपल्याला कोणीही ओळखू नये म्हणून त्यानेही केस बारीक आणि दाढी करून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला नंतर बेड्या ठोकून तळोजा कारागृहात धाडले होते.

मराठी माणसांवर हल्ले वाढले…

कल्याणच्या योगीधाम आजमेरा हाइट्स सोसायटीत डिसेंबर महिन्यात लता कळवीकुट्टे व अभिजित देशमुख यांच्या घरात धूप, अगरबत्ती लावल्यावरून शेजारी राहणारे अखिलेश शुक्ला यांनी वाद घातला. नंतर आठ-दहा साथीदारांना बोलावून शुक्ला यांनी कळवीकुट्टे व देशमुख कुटुंबीयांवर हल्ला केला. दुसरी घटना नांदिवली पंचानंद येथे जानेवारी महिन्यात घडली आहे. येथील साई कमल छाया सोसायटीत सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू कार्यक्रमावरून अनिल भट व चिराग लालन यांनी धिंगाणा घातला होता. तर तिसरी घटना दोन दिवसांपूर्वीची असून कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात सोनाली कळासरे या मराठी तरुणीवर गोकुळ झा या उत्तर भारतीय व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोर गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा या दोघांना मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.