कल्याणची स्मार्ट सिटी पुरात बुडाली; 110 कोटींचा निधी पाण्यात

अवघ्या ४८ तासांच्या पावसाने कल्याणची स्मार्ट सिटी पुरात बुडाली. कल्याणकरांच्या विरंगुळ्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून उभारण्यात आलेल्या सिटी पार्कला पुराने वेढा दिला आहे. प्रकल्पावर केलेला कोट्यवधींचा खर्च मातीमोल झाला आहे. उल्हास नदीचे पाणी प्रकल्पात शिरल्यामुळे बगीचामधील फुलझाडे, बालोद्यानातील खेळणी, पाळणे पाण्यात तरंगू लागले आहेत. स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, बॉटनी गार्डन, नर्सरी, जॉगिंग ट्रॅक, फूड कोर्टचे मोठे नुकसान झाले. पुरातून किमती साहित्य वाहून जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांची दिवसभर धावपळ सुरू होती.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने उल्हास नदीच्या काठावर कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा योगिधाम परिसरात ३० एकर जागेत सिटी पार्क साकारले आहे. सिटी पार्कच्या मधोमध उल्हास नदी आणि खाडीकिनारा यांचा संगम म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा अद्भुत नजराणा आहे. मात्र नियोजनाअभावी या प्रकल्पातून केवळ ठेकेदारांचे भले झाले आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे ठेकेदारांवर नियंत्रण नसल्याने पालिकेच्या सिटी पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची वाट लागली आहे. स्मार्ट सिटी योजनेतून यासाठी खर्च झालेला ११० कोटींचा निधी पुरामुळे अक्षरशः पाण्यात गेला.

कल्याणमध्ये म्हशींचे पार्किंग

गेल्या दोन दिवसांपासून धो धो कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीलगतच्या गोविंदवाडीतील शेकडो घरांमध्ये तसेच तबेल्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तबेल्यांमधील म्हशींना मालकांनी पुलावरील रस्त्यावर एका बाजूला सुरक्षितस्थळी बांधून ठेवले आहे. एरवी ज्या रस्त्यावर बाहनांची वाहतूक असते तिथे आता ‘म्हशींचे पार्किंग’ करण्यात आले आहे. गोविंदवाडीचा हा संपूर्ण परिसर खाडीच्या अगदी जवळ असल्याने घरांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मुरुडमध्ये बोटींचे पार्किंग

अडीच महिने बंद असलेली खोल समुद्रातील मासेमारी १८ ऑगस्टपासून सुरू झाली खरी, पण वादळी वारे.. आणि तुफानी पाऊस यामुळे मासेमारीच्या मोहिमेवर निघालेल्या असंख्य बोटींना ‘ब्रेक’ लागला, तटरक्षक दलाने सायरन वाजवून धोक्याचा इशारा देताच सव्वाशेहून अधिक मच्छीमार बोटी मुरुडच्या दिघी खाडीमध्ये सायडिंगला लागल्या आहेत. २३ ऑगस्टपर्यंत मच्छीमारांना रेड अलर्ट दिला असून वादळी वारे व पाऊस थांबण्याची कोळीबांधव वाट बघत आहेत.