कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारली

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी गुरुवारी शिकागो येथील डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) च्या शेवटच्या दिवशी अधिकृतपणे उमेदवारी स्वीकारली. अतिशय विचित्र परिस्थितीत मला उमेदवारी मिळाली असली तरी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चांगली उमेदवार आहे. मी अशी राष्ट्राध्यक्ष बनेन ज्यांच्याकडे कॉमन सेन्स असेल, अशा शब्दांत कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला केला. देशाला पुढे नेण्यासाठी अमेरिकन जनता माझ्यावर विश्वास ठेवू शकते. देशाला जोडणारी राष्ट्राध्यक्ष मी होईन. एक राष्ट्राध्यक्ष जो वाचू शकतो आणि ऐकू शकतो. या निवडणुकीमुळे आम्हाला जुनी कटुता, निराशा आणि फुटीरतावादी लढाईतून पुढे जाण्याची संधी आहे. ज्यांची कथा केवळ जगातील महान देशात लिहिली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

ट्रम्प यांचाही पलटवार

हॅरिस यांनी गेल्या साडेतीन वर्षांत बोलण्याशिवाय काहीही केले नाही. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करतात. त्या कॉम्रेड असून त्या इस्रायलचा द्वेष करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला भविष्य नाही, त्या आपल्याला तिसऱया महायुद्धाकडे घेऊन जातील, असा गंभीर आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर पलटवार केला.

ट्रम्प सत्तेत आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील

माझी आई 19 वर्षांची होती जेव्हा ती हिंदुस्थानातून एकटी कॅलिफोर्नियाला आली होती. तिने आम्हाला अन्यायाची तक्रार न करता लढत राहायला शिकवले. तू कोण आहेस हे सांगत बसू नको, तर तू कोण आहेस हे त्यांना दाखव, असे मला माझ्या आईने शिकवले आहे. ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आणण्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील, असा गंभीर आरोप करत कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प यांच्यावर फसवणूक आणि लैंगिक शोषणाचा आरोप आहे. लोकशाही संस्था कमकुवत करण्याचा त्यांचा हेतू आहे, असेही त्या या वेळी म्हणाल्या. कमला हॅरिस यांना अमेरिकेतील हिंदू समाजाचा मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.