मांजर आणि उंदीर कोण, हे जनताच ठरवेल, कमलनाथ यांचा ज्योतिरादित्य यांना टोला

2089

मध्य प्रदेशमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असा टोला कॉँग्रेस नेत्यांना उद्देशून लगाविला होता. त्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, कॉँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ‘मी टायगर नाही; पण मांजर आणि उंदीर कोण, हे जनताच ठरवेल,’ असा टोला भाजपच्या आश्रयास गेलेल्या ज्योतिरादित्य यांना लगाविला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉँग्रेसचे 22 आमदार सोबत घेऊन बंडखोरी करीत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडले. कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या शिंदे समर्थकांच्या मतदारसंघांत लवकरच विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर धार जिह्यातील बदनावारमध्ये कॉँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य आणि भाजपच्या स्वार्थी राजकारणावर जोरदार निशाणा साधला.

‘मी महाराजा नाही… मी मामाही नाही… मी कधी चहा विकला नाही… मी टायगर नाही… मी कमलनाथ आहे…’ असे बजावितानाच ‘‘मांजर आणि उंदीर कोण, हे मध्य प्रदेशची जनताच ठरवेल,’ असा टोला ज्योतिरादित्य आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लगाविला.

आपली प्रतिक्रिया द्या