बोल्टचा विक्रम मोडणाऱ्या तरुणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव, पण ‘ट्रायल’ देण्यास नकार

1442

म्हशींच्या पारंपारीक शर्यतीमध्ये (कंबाला) विश्वविक्रम रचणाऱ्या श्रीनिवास गौडा याने मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. बंगळुरूमध्ये श्रीनिवास याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. मात्र त्याने हा विक्रम खरा आहे अथवा नाही हे पाहण्यासाठी ट्रायल देण्यास सध्या नकार दिला आहे. सोशल मीडियावर कर्नाटकमधील तरुणाने 100 मीटरचे अंतर अवघ्या 9.55 सेकंदांमध्ये पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर श्रीनिवास चर्चेत आला होता.

जमैकाचा प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने 100 मीटरचे अंतर 9.58 सेकंदांमध्ये पूर्ण करत विश्वविक्रम केला होता. त्यावेळी बोल्टचा हा विक्रम कोणीही तोडू शकणार नाही असा दावा करण्यात येत होता. श्रीनिवास गौडा याने म्हशींच्या शर्यतीमध्ये हा विक्रम मोडल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. पाणी भरलेल्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीचे श्रीनिवासने 142.5 मीटरची ही शर्यत 13.62 सेकंदामध्ये पूर्ण केली. याचाच अर्थ त्याला 100 मीटरचे अंतर पार करण्यासाठी अवघे 9.55 सेकंद लागले असा दावा युजरने केला होता.

सोशल मीडियावर श्रीनिवासचे प्रचंड कौतुक सुरू असताना केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रीजिजू यांनी साईमधील प्रमुख प्रशिक्षकांच्या देखरेखेखाली श्रीनिवासला ट्रायल देण्याचे निर्देश दिले होते. परंतु श्रीनिवासने ट्रायल देण्यास नकार दिल्याचे साई या संस्थेने सांगितले आहे. सध्या तो ट्रायल देण्यास इच्छुक नसून तो सध्या दुखापतग्रस्त असल्याचे साई संस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

3 लाखांचे बक्षिस
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कंबालाच्या शर्यतीमध्ये विक्रम रचणाऱ्या श्रीनिवास गौडा याचा सत्कार केला आहे. श्रीनिवासला मुख्यमंत्र्यांनी 3 लाख रुपयांचे बक्षिस आणि प्रशिस्तिपत्रक देऊन गौरव केला. विशेष म्हणजे गौडाने आतापर्यंत कंबालामध्ये 32 पदकांची कमाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या