
कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात जोरदार विजयांसह डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली तर पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब (आरबीएससी) अशा उपांत्य लढती रंगतील. पुरुषांच्या ‘अ’ गटात विजय क्लब- लायन्स स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन – जय भारत यांच्यात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी संघर्ष होईल.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (आरएमएमएस) कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात महिलांच्या गटात बलाढय़ शिवशक्ती महिला संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा 43-7 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. विश्वशांतीनेही जिजामाता स्पोर्ट्स क्लबवर 43-10 अशी सहज मात करीत अंतिम चार संघात आपले नाव पक्के केले. आता डॉ. शिरोडकर- स्वामी समर्थ आणि विश्वशांती- शिवशक्ती अशा तुल्यबळ उपांत्य लढती रंगतील.
पुरुषांच्या व्यावसायिक गटात आरबीएससीने ओमकार, आर्यन ढवळे आणि सागर जगताप यांच्या वेगवान चढायांच्या जोरावर गंधेकर इलेक्ट्रिकलचा 44-20 असा फडशा पाडला. तसेच रिझर्व्ह बँकेनेही ओमकार थोटे आणि संग्राम साळुंखे यांच्या तुफानी चढायांमुळे रुबी कन्स्ट्रक्शनचे आव्हान 34-23 असे संपुष्टात आणले. श्री स्वामी समर्थने सीबीसी संघाचा 32-16 असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आयकरने बीपीसीएलचा 37-32 असा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला.
पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबसमोर अंकुर स्पोर्ट्स क्लबही एक चालले नाही. विजयने एकतर्फी सामन्यात 42-28 असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. लायन्स स्पोर्ट्स क्लबने हर्ष मोरे आणि राज आचार्य यांच्या चढायांच्या बळावर गुड मार्ंनग स्पोर्ट्स क्लबचा 28-26 असा पराभव केला.