
>> प्रज्ञा वझे
कमलाकर पोद्दार हे पुण्यातील निवृत्त इंजिनीअर ज्यांना निवृत्तीनंतरच्या वेळात जोपासलेल्या छंदातून नवी ओळख मिळाली आहे. टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी मनोरंजनात्मक खेळणी बनविली आहेत.
पुण्यातील 79 वर्षीय निवृत्त मेकॅनिकल इंजिनीअर कमलाकर पोद्दार घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून मनोरंजक आणि गमतीशीर खेळणी बनवतात. या टाकाऊ वस्तूंमध्ये झाकणे, स्ट्रॉ आणि जुने डबे यांचा समावेश आहे.
झाकणे, स्ट्रॉ आणि जुने डबे या सगळ्या ‘वेस्ट’ वस्तूंमधून काहीतरी नवे, क्रिएटिव्ह बनवायची आवड कमलाकर पोद्दार यांना लहानपणापासूनच होती. मात्र आज त्याचा हा छंद फक्त वेळ घालवण्यापुरता राहिला नाही, तर त्यांची ओळख बनला आहे.
टाटा मोटर्सच्या सेवानिवृत्तीनंतरही कमलाकर काका खऱया अर्थाने पुन्हा आपल्या जुन्या छंदात रमले. याद्वारे त्यांच्या मनातलं लहान मूल तसच जिवंत ठेवून ते या टाकाऊ वस्तूंचे पुनर्वापर करण्यातला आनंद घेतात.
विशेष म्हणजे ही खेळणी ते कधी फेकत नाहीत, विकतही नाहीत. ते फक्त ही खेळणी आनंदाने वाटण्यास तयार असतात.
गल्ली असो, बाजार असो वा रुग्णालय, पोद्दार काका आपल्या खेळण्यांनी तेथे आनंद पेरताना दिसतात. मुलं असोत की मोठे जे कोणीही, त्यांच्या बनवलेल्या खेळण्यांशी खेळतो तो चेहऱ्यावर हसू आणि मनात भरपूर प्रेरणा घेऊन परततो. त्यामुळे पुण्यातील सर्वजण प्रेमाने त्यांना ‘पोद्दार काका’ म्हणतात.
त्यांच्या घरात आजही वोकिंग टॉय, हार्मोनियम, फुलपाखरू, रनिंग माऊस अशी कागद, प्लास्टिक, स्ट्रॉ, जुने डबे या सगळ्यांपासून बनलेली खेळणी आपल्याला दिसतात.
जगायचं कसं हे तर कमलाकर पोद्दार काका शिकवतातच, पण त्याचबरोबर छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत ‘वेस्ट’लाही नवे जीवन देत मनातले लहान मूल कसे जिवंत ठेवता येते याचा परिपाठच पोद्दार काका घालून देतात.






























































