कांदिवलीत लग्न हॉलमधील लसीकरण केंद्रावरून काँग्रेस-भाजप आमने सामने

कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील एका लग्न हॉलच्या ठिकाणी सुरू झालेल्या लसीकरण केंद्रावरून भाजप-काँगेस आमने सामने आल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी शनिवारी एक लग्नसोहळा पार पडल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेत भाजपने लसीकरण केंद्र बंद केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पूर्वनियोजनानुसार शनिवारचा कार्यक्रम कोरोना खबरदारी घेऊन पार पडल्याचे भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुरेखा पाटील यांनी सांगितले.

मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या सहाय्याने उपलब्ध होणाऱया जागांच्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. यानुसार लोखंडवाला येथील एका हॉलमध्ये मोफत मिळालेल्या जागेत 12 मेपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र लसीकरणासाठी जागा देताना ट्रस्टींकडून नियोजित लग्नसोहळ्यासाठी आपल्याला हॉल उपलब्ध करावा या अटीवरच जागा देण्यात आली होती. यानुसार शासनाचे नियम आणि कोरोना खबरदारी घेऊनच लग्नसोहळा पार पडला.

काँग्रेसच्या माजी नगरसेविका अजंता यादव यांनी नाहक राजकारण केल्याचा आरोपही सुरेखा पाटील यांनी केला. दरम्यान, काँग्रेसच्या अजंता यादव यांनी लसीकरणाच्या ठिकाणी इतर कार्यक्रम करता येत नाही असा पालिकेचा नियम असल्याचे सांगत लसीकरणाच्या ठिकाणी होणाऱया लग्नसोहळ्यावर आक्षेप घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या