मुलांसाठी खेळणी, सुस्कर संगीत, पायवाटांसह झाडांची आकर्षक रंगरंगोटी, हिरवेगार लॉन अशा अनेक सुविधांमुळे कांदिवली चारकोप सेक्टर-2 येथील चंद्रनील उद्यानाचे रूपडे पालटले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या नगरसेवक निधीतून काम झालेल्या उद्यानाचे लोकार्पण युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यटनमंत्री आणि उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील उद्यानांचा कायापालट होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील चंद्रनील उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. येथील झाडांच्या खोडांवर गेरू आणि चुन्याने आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे उपद्रवी जीवजंतूंपासून झाडांचे संरक्षण होऊ शकणार आहे. तसेच येथील पेव्हर ब्लॉक्सनाही रंग देण्यात आल्यामुळे पायवाट आकर्षक झाली आहे. उद्यानात नक्याने गवताच्या लाद्या (लॉन) बसवण्यात आल्या आहेत. तर उद्यानात सुस्कर गाणी ऐकण्याकरिता संपूर्ण उद्यानात संगीत प्रणाली बसवण्यात आली आहे. उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी 15 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, उपविभागप्रमुख राजू खान, राजन निकम, शाखाप्रमुख निखिल गुढेकर, शाखासंघटक शिल्पा गुरव आदी उपस्थित होते.
























































