
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून हल्ला केल्याची घटना कांदिवलीच्या पश्चिमच्या एकता नगर येथे घडली. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून पाच जणांना अटक केली.
रविवारी रात्री अनिल नावाच्या एकाचा पह्न हिसकावण्याचा प्रयत्न नीलेश आणि इलायची नावाच्या दोघांनी केला. त्यानंतर अनिलने याची माहिती त्याचे नातेवाईक शिवम यादवला दिली. काही वेळाने शिवम हा त्याचा मित्र दशरथ आणि भीम कनोजिया याच्यासोबत तेथे आला. तेथे जाऊन त्याने नितेशला जाब विचारला. जाब विचारत असताना विकी सिंह आणि नितेश यांच्यात हाणामारी सुरू झाली. याची माहिती स्थानिकांनी कांदिवली पोलिसांना दिली.
काही वेळात कांदिवली पोलिसांचे पथक तेथे आले. बीट मार्शल पोलीस हवालदार कोयंडे यांच्यासह त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. त्याचदरम्यान पपू झा आणि त्याचे वडील चंद्रकांत झा, सुमन झा, गुड्डू झा आणि विकी सिंह याने गोंधळ घातला. त्या वेळेस पोलीस शिपाई सागर बाबर यांनी त्यांना शांत राहण्यास सांगत होते. मात्र ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्याने बाबर यांना धक्काबक्की केली. एवढंच नव्हे तर बाबर यांना बुक्क्यांनी मारहाणदेखील करण्यात आली. याची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंभार आणि हवालदार खोत हे तेथे आले. त्यांनादेखील शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांची कॉलर धरल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा नोंद करून पाच जणांना अटक केली आहे.



























































