आता बोरिवली, वसई, विरार येथील नागरिकांना थेट कोकणात जाता येणार आहे. बोरिवली रेल्वे स्थानकातून कोकणासाठी सुटणाऱ्या वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नियमित गाडी 10116 मडगाववरून 3 सप्टेंबर रोजी वांद्रे टर्मिनससाठी मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी रवाना होईल. त्याच दिवशी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी वांद्रे स्थानकात पोहोचेल. त्यानंतर 4 सप्टेंबरपासून वांद्रे टर्मिनसवरून मडगावसाठी 10115 क्रमांकाची गाडी बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी रवाना होईल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता मडगावला पोहोचेल. रेल्वे बोर्डाने पश्चिम रेल्वेला मडगाव-वांद्रे एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली होती. ही ट्रेन आठवडय़ातून दोन वेळा धावणार असून पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली, वसई, विरार येथील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी ही एक्स्प्रेस अत्यंत सोयीची ठरणार आहे.
येथे थांबा असेल
या एक्स्प्रेसला बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल.