कणकवलीत उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली 

609

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या एस.एम. हायस्कूलसमोरील भरावाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराच्या बोगस कामाबाबत नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

खासदार विनायक राऊत यांनी या ठिकाणी भेट देत ठेकेदाराचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबाबत लेखी सूचनादेखील महामार्ग प्राधिकरणकडून देण्यात येणार आहेत. यापूर्वी काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असतानादेखील काम सुरू केले. त्यामुळे ठेकेदारावर निश्चितच कारवाई केली जाणार आहे, असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार आर.जे. पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक रुपेश नार्वेकर, राजू राठोड, सुजित जाधव आदीसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ठेकेदारविरोधात नाराजीचा सूर; कारवाईची मागणी

महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र त्याकडे हायवे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना शहरवासीयांतून व्यक्त होत आहे. ठेकेदार केंद्राचा जावई असल्याप्रमाणे वागत असल्याने काम बंद ठेवून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या