बुमराहने माझे भाकीत खोटे ठरविले! कपिल देव यांची स्तुतिसुमने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आपल्या वेगळय़ा शैलीमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेला ‘टीम इंडिया’चा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्तुतिसुमने उधळली. ‘खरं तर बुमराह’ची विचित्र गोलंदाजी शैली बघून हा लंबी रेसचा घोडा नाही असे भाकीत मी केलं होतं, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बुमराहची दहशत बघता त्याने माझे भाकीत खोटे ठरविले, अशा शब्दांत कपिलदेव यांनी त्याचे कौतुक केले.

कपिल देव म्हणाले, जेव्हा मी बुमराहला प्रथमच गोलंदाजी करताना बघितले तेव्हा हा जास्त काळ टिकणार नाही असे मला वाटले होते, मात्र बुमराह आंतरराष्ट्रीय स्तरावर नुसताच टिकला नाही तर ऑस्ट्रेलियात त्याने जी अफलातून कामगिरी केली ते बघून या वेगवान गोलंदाजाला मला सलाम करावा वाटतो. त्याची चेंडू टाकण्यापूर्वीची आकलन क्षमता, छोटय़ा रनअपमध्ये सातत्याने 140हून अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता बघता बुमराहचा आदर करावाच लागेल. जुन्या आणि नव्या दोन्ही चेंडूसोबत बुमराह चांगली गोलंदाजी करतो.