… तर मग आयपीएल खेळू नका, कपिल देव यांनी खेळाडूंना फटकारले

1646

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने एक दिवसीय मालिकेत सर्वच सामने गमावल्यानंतर कसोटी मालिकेची सुरुवात देखील दारुण पराभवाने झाली. एक दिवसीय सामन्यांपासून इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत सुमार होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठत आहे. टीम इंडियाचा हा फ्लॉप शो पाहून माजी कर्णधार कपिल देव देखील भडकले असून त्यांनी खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. ‘जर सततच्या खेळामुळे दमला असाल तर आयपीएल खेळू नका’, अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना फटकारले आहे.

‘जर तुम्हाला वाटत आहे की मी खूप दमलोय तर आयपीएल खेळू नका. तिथे तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत नसता. त्यामुळे जर दमला असाल तर आयपीएलच्या काळात ब्रेक घ्या. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुमची वेगळी भावना असायला हवी. तुम्ही तुमचा सर्वोत्कृष्ट खेळ खेळण्याची गरज असतो. देशाचे प्रतिनिधित्व करताना कोणतीही तडजोड योग्य नाही’, असे कपिल देव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात झालेला पहिला कसोटी सामना यजमान संघाने 10 विकेट्सने जिंकला. पहिल्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये टीम इंडियाचा संघ 200 धावाही करू शकला नाही. न्यूझीलंडच्या धारधार गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज मैदानात टिकू शकले नाहीत. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी अति साधव भूमिका घेतली होती. दुसऱ्या डावामध्ये हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडपेक्षा मागे असताना मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने डिफेन्सीव्ह मोडमध्ये जात 81 चेंडूत फक्त 11 धावा केल्या, तर हनुमा विहारी यानेही 79 चेंडू खेळून फक्त 15 धावा फटकावल्या होत्या

दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला धक्का

दुखापतीतून सावरल्यानंतर  पहिल्या कसोटीसाठी संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉ यालाही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु आता त्याला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान पृथ्वी शॉ याच्या पायाला सूज आली आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असून पायाच्या दुखापतीमुळे बुधवारी तो सरावही करू शकला नाही. जर पृथ्वी शॉ याच्या तपासणीचा अहवाल गंभीर आला तर त्याला दुसऱ्या लढतीत आराम देण्यात येईल. त्यामुळे शुभमन गिलला संधी मिळू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या