राजीनाम्यानंतर धनखड नॉट रिचेबल, कुठे आहेत… कुटुंब, मित्रमंडळींचे गूढ मौन; सिब्बल यांची मागणी, अमित शहा उत्तर द्या

‘जगदीप धनखड यांनी 22 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून आजतागायत ते समोर आलेले नाहीत. कुठे आहेत हेही कुणाला माहीत नाही. त्यांच्या कुटुंबासह, मित्रमंडळीही काही बोलत नाहीत. हे नेमके प्रकरण काय आहे? धनखड कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत ना,’ असा प्रश्न खासदार व कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी आज केला. गृहमंत्री अमित शहा यांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. जगदीप धनखड यांच्याबद्दल काहीही माहिती मिळत नसल्याबद्दल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली. ‘उपराष्ट्रपती झाल्यापासून ते सरकारचे संरक्षण करत होते, आता विरोधी पक्षावर त्यांचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे,’ असे सिब्बल म्हणाले. ‘माझे त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहेत. आम्ही एकत्र वकिली करत होतो. अनेक सुनावण्या एकत्र केल्या आहेत. धनखड यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी मी स्वतः त्यांना फोन केला होता, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने फोन उचलला होता. तो शेवटचा. त्यानंतर त्यांच्या वतीने कोणी फोनही उचलत नाही. अनेक नेत्यांशी माझी चर्चा झाली, ते म्हणतात आम्हीही फोन ट्राय करतोय. अशा परिस्थितीत काय करायचं हा प्रश्न आहे. हेबियस कॉर्पस याचिका दाखल करायची का, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

बांगलादेशींना शोधता, धनखडांचेही काहीतरी सांगा!

‘जगदीप धनखड कुठे आहेत याची माहिती गृह मंत्रालयाला नक्कीच असणार. अमित शहा यांनी त्यासंदर्भात जाहीर निवेदन द्यायला हवे. धनखड यांची तब्येतही ठीक नाही. ते उपचार घेतायत की काय याचा खुलासा व्हायला हवा. गृहमंत्र्यांनी यावर बोलायला हवे. त्यांच्याकडे अनेक साधने आहेत. गृहखाते देशातील बांगलादेशींना शोधून शोधून परत पाठवते. हे तर आपले माजी उपराष्ट्रपती आहेत, कृपया काहीतरी बोला. ते धडधाकट असतील, सुरक्षित असतील तर तसे सांगा, असे आवाहन सिब्बल यांनी अमित शहा यांना केले.

‘एखादी व्यक्ती गायब झाली आणि तिचा पत्ताच लागला नाही असे काही देशांमध्ये घडते. पण हिंदुस्थान हा लोकशाही देश आहे. इथे लोकांना माहिती मिळाली पाहिजे. धनखड यांच्या घरचे लोक आणि मित्रमंडळीही त्यांच्याबद्दल चर्चा करत नाहीत. देशाच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. मला काळजी वाटते.’