कर्ज वसूल करण्यासाठी माझ्या कुटुंबाची संपत्ती विका! डीएचएफएलचा प्रवर्तक कपिल वाधवानचे आरबीआयला पत्र

कोटय़वधीच्या कर्ज घोटाळाप्रकरणी अटकेत असलेला डीएचएफएलचा प्रवर्तक कपिल वाधवानने कुटुंबाची संपत्ती विकण्यास सहमती दिली आहे. डीएचएफएलच्या डोक्यावरील 90 हजार कोटींचे कर्ज कसूल करण्यासाठी माझी व माझ्या कुटुंबाच्या मालकीची 43 हजार कोटींची मालमत्ता विका, असा पर्याय वाधवानने सुचवला आहे. त्याने याबाबत आरबीआयने नेमलेले प्रशासक आर. सुब्रमण्यकुमार यांना पत्र लिहिले आहे.

कपिल वाधवान व त्याचा भाऊ धीरज वाधवान सध्या तळोजा तुरुंगात आहेत. येथूनच कपिलने सुब्रमण्यकुमार यांना नऊ पानी पत्र पाठवले आहे. आर्थिक वर्ष 2007 ते 2019 पर्यंत डीएचएफएलमध्ये 17,394 कोटींचा घोटाळा झाल्याचे ऑडिटमध्ये आढळले होते. डीएचएफएल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. याचदरम्यान कपिल वाधवानने कंपनीच्या डोक्यावरील कर्ज वसूल करण्यासाठी कुटुंबाची संपत्ती विकण्याचा पर्याय मांडला आहे. कंपनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या निविदांच्या पार्श्वभूमीवरही त्याने पत्रात स्वतःचे मत नोंदवले आहे. सर्व संपत्तीचे योग्य मूल्यांकन व्हावे, संपत्तीची चुकीची किंमत ठरवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे म्हणणे त्याने मांडले आहे. जुहू गल्ली आणि इर्ला येथील प्रकल्पांचे जवळपास 43,879 कोटी रुपये इतके मूल्यांकन करण्यात आले आहे. ही किंमत बाजार मूल्याच्या 15 टक्के असल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले आहे.

डीएचएफएलच्या खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. यात अदानी ग्रुप, पिरामल इंटरप्राइजेस, अमेरिकेतील ओकट्री आणि हाँगकाँगची एससी लोकी या कंपन्यांनी ’रिजोल्युशन प्लान’ सादर केला आहे. या प्रक्रियेत मलाही सूचना सादर करण्यास परवानगी द्या, अशी विनंती कपिल वाधवानने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या