कराड – पाटणमध्ये 1650 किलो वजनाची 66 बॉक्स स्फोटके जप्त

कराड येथील हरूगडेवाडी नवारस्ता (ता. पाटण) येथे क्रशर खाणींवर महसुली कारवाई करताना तब्बल 1650 किलो वजनाची 66 बॉक्स स्फोटके सापडली. याबाबतची माहिती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी पाटण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन एक लाख नव्यानऊ हजार पाचशे नव्वद रूपये किमतीची स्फोटके जप्त केली असून याबाबत पाटण पोलिसात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाटणचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या आदेशानुसार तहसीलदार योगेश टोम्पे यांनी हारूगडेवाडी नवारस्ता येथील बेकायदेशीर दोन खडी क्रशरवर कारवाई केली. त्यावेळी संबंधित दोन्ही खडी क्रशर सिल करत त्याठिकाणचे सात पोकलॅन मशीन जप्त केले. याचवेळी त्यांना घटनास्थळी इतस्ततः पडलेली स्फोटके आढळून आली त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पाटणचे उप-विभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात यांना दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांचेसह घटनास्थळी भेट दिली.

त्याठिकाणची 25 किलो वजनाची 66 बॉक्स अशी एकूण 1650 किलो वजनाची स्फोटके, 69 डिटोनेटर व स्फोट घडविण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 1 लाख 99 हजार 590 रूपयांचा माल जप्त केला. व याबाबत कलम 286, 34 भारतीय स्फोटकांचा कायदा कलम 9 ब तसेच बारीचे पदार्थ अधिनियम कलम 4 अन्वये पाटण पोलिसात गुन्हा नोंदविला आहे.

जप्त माल यशवंत एन्टरप्रायजेस सूर्यकांत यादव (पुसेसावळी ता. खटाव) यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. या गुन्ह्य़ातील स्फोटके हाताळण्याची जबाबदारी असलेले सूर्यकांत करजगर यांना ताब्यात घेतले. याशिवाय सूर्यकांत यादव पुसेसावळी ता. खटाव, सुनिल लक्ष्मण माथने नवारस्ता ता. पाटण यांचेविरूद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तपास पो. नि. एन आर. चौखंडे करीत आहेत. यातील आरोपी सूर्यकांत करजगर यांना गुरूवारी पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय अन्य दोन आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती चौखंडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या