करळ उड्डाण पुलावरून उरणकडील वाहतूक सूरू; 3 किलोमिटरच्या प्रवास टळला

433

करळ इंटरचेंज उड्डाण पुलाच्या एका मार्गिकेचे उदघाटन प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी यांच्याहस्ते करण्यात आले. रविवारपासून या पुलाचा एक भाग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे उरणकरांचा तीन किलोमिटरचा हेलपाटा कमी होणार असून सततच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

उरण पनवेल मार्गावर करळ येथे रेल्वे फाटक होते. उरण पनवेल मार्गावरील सगळी वाहतूक या फाटकातूनच होत असे. मात्र 1992 मध्ये एका डंपरने रेल्वेला धडक दिल्यानंतर हे फाटक रेल्वेने कायमस्वरूपी बंद केले. त्यामुळे उरण पनवेल मार्गावरील वाहतूक करळ उड्डाण पुलावरून सुमारे तीन किलोमीटर वळसा घालून करावी लागत असे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाढला होता. तसेच करळ पुलावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होत होता. हे फाटक सुरू करावे यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर गोपाळ पाटील यांनी या बाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, हे फाटक सुरू झाले नाही.

जेएनपीटीने 17 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याहस्ते रस्ता रूंदीकरणाचे भूमीपूजन करून करळ फाटा येथे सुमारे 350 कोटी खर्च करून इंटरचेंज पूल उभारण्याचे काम हाती घेतले. गेल्या 3 वर्षांपासून या पुलाचे काम सूरू आहे. मात्र उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी या पुलाची उरण पनवेल मार्गाला जोडणारी एक मार्गीका लवकर पूर्ण करून ती वाहतूकीसाठी सूरू करण्यात आली. हा पूल वाहतूकीसाठी खुला केल्याने उरणला जाणाऱ्याचे तीन किलोमीटर अंतर वाचणार असून वेळेचीही बचत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या