कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या काळात कोविडमध्ये सात हजार 223 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी काँग्रेसने एसआयटी नेमली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मायकल यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या घोटाळ्यावर एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड काळात अनेक वैद्यकीय उपकरणे घेण्यात आली. त्यात मास्क, औषध, ऑक्सिजन सिलिंडर आणि पीपीई किट घेताना सरकारकडून कुठलीच परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या काळात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकडय़ातही फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या एसआयटीसोबत आणखी एक उपसमितीही नेमण्यात आली. त्यात संबंधित उपकरणांच्या किंमतीबद्दल आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही उपकरणे विकत घेण्याचे आदेश दिले त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यात ज्या कंपन्या दोषी आढळतील त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल असेही सरकारने म्हटले आहे.