हेलिकॉप्टर दादाची रिल झाली व्हायरल, कर्नाटकातील हरवलेल्या मनोरुग्ण तरुणाचा लागला शोध

>> मनिष म्हात्रे

फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब या समाजमाध्यमामुळे दोन वर्षांपूर्वी हरवलेल्या एका 25 वर्षीय मनोरुग्ण तरुणाचा शोध लागला आहे. नालासोपाऱ्यातील यश माने याने आठवड्याभरापूर्वी त्या तरुणाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. हा व्हिडीओ मनोरुग्ण तरुणाच्या कुटुंबियांनी पाहिल्यानंतर ते त्याला घ्यायला आले.

विमानात किंवा हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, गरीब आणि ज्यांची आर्थिक स्थिती नसते त्यांच्यासाठी हे स्वप्नच असतं. यश माने या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने अनेक मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवून आणली आहे. त्यामुळे यशला परिसरात ‘हेलिकॉप्टर दादा’ या नावाने ही मुलं ओळखतात.

यश माने याने दिवाळीमध्ये वसई विरार परिसरातील 3000 बेघर, अनाथ मुलांना मिठाईचे वाटप केले होते. 19 ऑक्टोबर रोजी विरार पश्चिम जकात नाका येथे रात्री साडे अकराच्या सुमारास तो मिठाई वाटप करत होता. यावेळी एका पंचवीस वर्षीय गरजू मनोरुग्ण तरुणाला तेथील काही लोक हुसकावत असताना माने यांनी त्याला वाचवले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्याचा हा व्हिडिओ रातोरात सगळीकडे प्रचंड व्हायरल झाला.

आठवड्याभरानंतर हा व्हिडिओ त्या मनोरुग्ण तरुणाच्या कर्नाटकातील गावातही पोहोचला.कर्नाटकातील बेल्लारी येथील जुनी मस्सीज, हगरीबोम्मनहल्ली येथे राहणाऱ्या खसीम बंडी यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा सलीम घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला होता मात्र तो सापडला नाही. मनोरुग्ण असलेला सलीम हरवला असल्याची तक्रार त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र तो शोध घेऊनही न सापडल्याने तो आता या जगात नसल्याची घरच्यांचा समज झाला. मात्र व्हिडिओत दिसणारा मुलगा हा आपला हरवलेला सलीम असल्याचे लक्षात आल्यानंतर खसीम यांनी थेट इंस्टाग्राम अकाउंट वरील नंबरवर संपर्क साधला. यश माने यांनी हा तुमचा मुलगा असेल तर तसा पुरावा सोबत घेऊन मुंबई गाठा असे सांगितले. तोपर्यंत त्याची मी काळजी घेतो असा धीरही दिला. त्यानंतर खसीम बंडी यांनी त्यांचे भाऊ व गावातील दोन  लोकांना सोबत घेत थेट मुंबई व नंतर लोकल ट्रेनने विरार गाठले. मंगळवारी सकाळी पाच वाजता यश माने यांनी त्यांना घेऊन सलीमला सुरक्षित ठेवलेल्या जकात नाका परीसरात नेले. तब्बल दोन वर्षानंतर आपल्या मुलाला पाहिल्यानंतर खसीम यांनी सलीमला कडकडून मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सलीमनेही मायेचा स्पर्श अनुभवला,वडीलांना ओळखले आणी तोही लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला.

हरवलेला मनोरुग्ण सलीम हाच कर्नाटकातील खसीम बंडी यांचा मुलगा असल्याचे त्यांनी सोबत आणलेल्या फोटोवरून जरी सिद्ध झाले असले यशने त्या सर्वांना बोळींज पोलीस ठाण्यात नेले. कायदेशीर बाबी पूर्ण करुन पोलिसांच्या समक्ष त्याने सलीमचा ताबा त्याच्या कुटुंबीयांना दिला.