भाजप आमदाराला अटक; जातिवाचक शिविगाळ; जीवे मारण्याची धमकी अन् 30 लाखांच्या खंडणीच्या मागणीचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील आमदार मुनिरत्ना यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका ठेकेदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि जातिवाचक शिविगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही त्यांनी केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. BJP MLA Munirathna यांच्याविरोधात ठेकेदार छेलवराजू यांनी एफआयआर दाखल केली आहे.

मुनिरत्ना हे बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. पहिल्या प्रकरणात मुनिरत्ना यांच्यासह चार सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक अभिषेक व वसंत कुमार आणि व्ही.जी. कुमार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात मुनिरत्ना यांनी आपल्याला जातिवाचक शिविगाळ केल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे.

छेलवाराजू यांच्या फिर्यादीनुसार, मुनिरत्ना यांनी 2021 मध्ये घनकरचा विल्हेवाट प्रकल्पासाठी त्यांच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आणखी कचरा व्यवस्थापन करारांतर्गत 10 ऑटो ट्रिपर खरेदी करण्यासाठी 10 लाखांची मागणी केली. तसेच वारंवार त्रास देत शिविगाळ केली आणि मारहाणही केली.

दरम्यान, पोलिसांनी आमदार मुनिरत्ना यांना अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले. पोलिसांनी एक आठवड्याच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायमूर्ती संतोष गजाना भट्ट यांनी ही मागणी फेटाळत त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

ठेकेदार छेलवाराजू यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदाराचा भांडाफोड केला. मुनिरत्ना यांनी 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास करार संपवण्याची धमकीही आमदाराने दिली. याप्रकरणी छेलवाराजू यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आमदार मुनिरत्ना यांच्याविरोधात कलम 37, 506, 505, 385, 420 आणि 323 अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.

भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपला घेरले असून मुनिरत्ना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही याची दखल घेत मुनिरत्ना यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 5 दिवसांमध्ये खुलासा करण्यास सांगितले आहे.