17 आमदार भाजपच्या गळाला, उद्या करणार पक्षप्रवेश!

7235

कर्नाटकमधील काँग्रेस- जनता दल सेक्युलर या पक्षांचे 17 अपात्र आमदार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यंमत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या काँग्रेस- जनता दल सेक्युलर या पक्षांच्या 17 आमदारांनी बुधवारी धक्का बसला. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे ते 17 आमदार अपात्रच ठरले आहेत. मात्र या आमदारांना निवडणूक लढविण्यास मात्र सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांनी कुमारस्वामी सरकारविरोधात बंड पुकारत कर्नाटकात भाजप सरकार येण्यास मदत केली होती. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी व्हीप नाकारणार्‍या या आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगितले आहे.

पोटनिवडणूक लढवता येणार

निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या 17 रिक्त जागांपैकी 15 मतदारसंघांत पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 5 डिसेंबरला मतदान आणि 9 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्या 17 आमदारांना पोटनिवडणूक लढवता येणार आहे. अपात्र आमदारांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या