कर्नाटकमध्ये भाजपला घाम फुटला

2380

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक जाहीर झाली असतानाच निवडणूक आयोगाने कर्नाटकमध्ये पोटनिवडणूक जाहीर करून भाजपची गोची केली आहे. काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाचे आघाडी सरकार उलथवून तिथे भाजपची सत्ता आणणाऱ्या मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारचे बहुमत पोटनिवडणुकांमुळे पुन्हा धोक्यात आले आहे. काँग्रेस-जेडीएसमधून फुटून भाजपमध्ये दाखल झालेल्या 17 आमदारांच्या विधानसभा जागांपैकी 15 जागांवर या पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये पक्षांतर केलेल्या या 15 आमदारांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे भाजपला घाम फुटला आहे.

कुमारस्वामी यांचे काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाचे सरकार उलथवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या 17 आमदारांना 2019 मध्ये विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी कर्नाटक विधानसभा कार्यकाळ संपेपर्यंत (2023) पक्षांतर कायद्यानुसार अपात्र ठरवले. त्याचबरोबर कर्नाटक विधानसभा भंग केल्यामुळेही त्यांच्या पात्रतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात लागेपर्यंत त्यांना थांबावे लागणार आहे. त्यात आता पोटनिवडणुकांमुळे या आमदारांचे राजकीय भवितव्यच धोक्यात आले आहे. पोटनिवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहेत.

  • पात्रतेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेल्या बंडखोर आमदारांची निवडणूक आयोगाच्या पोटनिवडणुकीच्या दणक्यामुळे 17 बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले असून आयोगाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या, 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे, असे काँग्रेसचे नेते के. सुधाकर यांनी सांगितले.
  • गोकक, अथानी, रानीबेनूर, कागवाड, हिरेकर, येलापूर, यशवंतपुरा, विजयनगर, शिवाजीनगर, होसाकोट, हुनसूर, कृष्णराजपेट, महालक्ष्मी लेआऊट, के. आर. पुरा आणि चिकबल्लापुरा या विधानसभा मतदारसंघात निवडणुका होतील, मात्र आर. आर. नगर आणि मस्की विधानसभा क्षेत्रात नंतर निवडणूक होणार आहे.

भाजपला बहुमतासाठी सहा आमदारांची गरज

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत. त्यातील एक स्वीकृत सदस्य आहे. त्यामुळे एकूण जागा 224 आहेत. कर्नाटकमध्ये 21 ऑक्टोबरला 17 पैकी 15 जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. उर्वरित दोन जागांवर नंतर मतदान घेतले जाणार आहे. भाजपकडे 106 जागा आहेत. 17 आमदारांना कर्नाटक अध्यक्षांनी अपात्र घोषित केल्यामुळे आता बहुमतासाठी भाजपला सहा आमदारांची गरज आहे. काँग्रेकडे 66, जेडीएसकडे 24 तर बसपकडे एक आमदार आहे. राज्यात काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाचे आघाडी तुटली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष या पोटनिवडणुका वेगवेगळ्या लढतील.

आपली प्रतिक्रिया द्या