
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि जनता दलाचा (एस) माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैगिंक छळाच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. प्रज्ज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल असून अनेक महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालय शनिवारी म्हणजे उद्या 2 ऑगस्ट 2025 ला निकाल देणार आहे. प्रज्ज्वल रेवण्णाला न्यायालय काय शिक्षा सुनावणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रज्ज्वल रेवण्णाने जेडीएस पक्षाकडून 2019 मध्ये हसन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, 2024 च्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. त्याचे आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आणि वडील मंत्री होते. दरम्यान, प्रज्ज्वल रेवण्णाच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तसेच बंगळुरूमध्ये अनेक पेन ड्राईव्ह सापडले होते. आणि त्या पेनड्राईव्हमध्ये 3 ते 5 हजार व्हिडीओ सापडल्याचा दावा करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये महिलांचा लैंगिंक छळ करतानाच्या क्लिप होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर करण्यात आला आहे. या सर्व आरोपांमुळे प्रज्ज्वल रेवण्णाला जेडीएसने पक्षातून निलंबित केलं होतं. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णाला दोषी ठरवलं आहे.