फक्त 18 महिन्यात 185 कोटींनी वाढली आमदाराची संपत्ती!

1581

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कर्नाटकातील होसकोटे विधानसभा मतदारसंघाचे आमदार एमटीबी नागराज यांनी नुकतेच संपत्तीबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे 1200 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1201 कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी पतिज्ञापत्रात म्हटले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एमटीबी नागराज काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीची आकडेवारी पाहिल्यास फक्त 18 महिन्यात त्यांच्या संपत्तीत 185 कोटींनी वाढ झाली आहे. याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नागराज यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1015 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. सध्या त्यांच्याकडे 419.28 कोटींची चल संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 167.34 कोटींची चल संपत्ती आहे. 2018 आणि 2019 च्या नागराज यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या चल संपत्तीत 104.53 कोटींनी वाढ झाली आहे. तर त्यांची पत्नी शांताकुमारी यांची चल संपत्ती 44.95 कोटींनी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात फक्त सहा दिवसात नागराज यांच्या संपत्तीत 25.84 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यानंतर 15 दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीत एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार पाडण्यात नागराज यांनी मदत केली होती.

कुमारस्वामींचे सरकार पडल्यानंतर भाजपच्या बी.एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रापदाची शपथ घेत सरकार स्थापन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलेल्या 17 पैकी 16 आमदारांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये एमटीबी नागराज यांचा समावेश आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या