कॉरिडॉरआडून पाकिस्तानचे षडयंत्र

>> शैलेंद्र देवळाणकर

करतारपूर कॉरिडॉर पूर्ण करण्याची मागणी अटलबिहारी वाजपेयींच्या काळापासून हिंदुस्थान करत आला आहे, पण पाकिस्तानने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. अचानक गेल्या वर्षी इम्रान खानने हा मुद्दा हाती घेतला आणि त्याची पायाभरणी सुरू केली. आता त्याचे बांधकामही पूर्ण झाले असून 8 नोव्हेंबर रोजी या कॉरिडॉरचे उद्घाटन आहे. पाकिस्तानने अचानक घेतलेला पुढाकार हा हिंदुस्थानशी संबंध सुधारण्याचा भाग आहे असे मानता येणार नाही. कारण या कार्यक्रमाला खलिस्तानी चळवळीतील अनेक बडय़ा नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याचाच अर्थ या माध्यमातून पाकिस्तान खलिस्तानी चळवळींचे पुनरुज्जीवन करत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले करतारपूर कॉरिडॉरचे काम 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील संबंध कितीही तणावपूर्ण बनलेले असले तरी आणि कलम 370 आणि 35 अ काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी आणि शस्त्र्ासंधी कराराच्या उल्लंघनानंतर हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले असले तरी करतारपूर कॉरिडॉर  हे एक असे माध्यम असू शकते की ज्यानिमित्ताने दोन्ही देशांच्या संबंध सुधारणांची एक संधी उपलब्ध आहे. पण खरोखरीच ही संधी आहे का? की पाकिस्तानचा याहीमध्ये काही डाव आहे? हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अटलबिहारी वाजपेयींच्या काळापासून करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानने पुढाकार घेऊन पूर्ण करावा अशी मागणी हिंदुस्थान करत आला आहे, पण पाकिस्तान त्याकडे लक्ष देत नव्हता. आता अचानक गेल्या वर्षी इम्रान खानने त्याकडे लक्ष वळवले आणि त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी एक वर्षात याचे बांधकाम पूर्ण करण्याचे ठरले होते. त्यानुसार हे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि 8 नोव्हेंबर रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी पाकिस्तानने साडेचार किलोमीटरचा एक कॉरिडॉर तयार केला आहे. या माध्यमातून शीख धर्मीय तेथे जाऊ शकतात आणि दर्शन घेऊ शकतात. यासंदर्भात हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये चर्चेच्या अनेक फेऱयाही झाल्या आहेत. तथापि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला पाकिस्तानने खलिस्तानी चळवळीतील हिटलिस्टवरील नेत्यांना आमंत्रित केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे जाहिरातींचे फलकही लावण्यात आले आहेत. गतवर्षी पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या वेळीही पाकिस्तानने अशाच पद्धतीने खलिस्तानी चळवळीच्या नेत्यांना बोलावले होते. त्यामुळेच त्या कार्यक्रमाला हिंदुस्थानने सरकारमधील कोणताही अधिकृत व्यक्ती या कार्यक्रमाला पाठवलेला नव्हता.  या कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तान खलिस्तानी चळवळींना प्रोत्साहन देण्याचे आपले जुने षड्यंत्र पुढे नेत नाहीये ना याकडे हिंदुस्थानला अत्यंत बारकाईने नजर ठेवून राहणे गरजेचे आहे. तसेच यानिमित्ताने करतारपूर कॉरिडॉर नेमका काय आहे आणि पाकिस्तान नेमक्या कशा प्रकारे याआडून षड्यंत्र रचत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

काय आहे करतारपूर कॉरिडॉर?
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात असणारे दोन पवित्र गुरुद्वारा जोडण्याचे काम सध्या पाकिस्तानकडून पूर्ण करण्यात आले आहे. पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहेब करतारपूर आणि आपल्याकडील गुरुदासपूर जिह्यातील डेराबाबा नानक साहेब ही दोन्ही शीख धर्मीयांची पवित्र स्थळे आहेत. गुरुनानक देव यांचे वास्तव्य असणाऱया करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहेब या गुरुद्वाराची रावी नदीच्या किनाऱयावर स्थापना केली गेली. तिथे त्यांचे 18 वर्षे वास्तव्य होते. त्याचप्रमाणे शीख धर्मीयांचे दुसरे गुरू भाई लेहना (गुरू अंगद) हे मूळचे करतारपूरचे. त्यामुळे शीख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असे ते स्थळ आहे. वर्षातून चार वेळा हजारोंच्या संख्येने शीख बांधव तिथे भेट देत असतात, परंतु ही भेट देताना व्हिसाचा प्रश्न निर्माण व्हायचा आणि या भेटीत अडथळे निर्माण व्हायचे. त्यामुळे व्हिसामुक्त असा एक कॉरिडॉर तयार करण्यात यावा अशी सर्वच शीख धर्मीयांची मागणी होती. जेणेकरून पारपत्राशिवाय दरबार साहेब गुरुद्वाराला भेट देता येईल. याबाबतची मागणी गेल्या 30 वर्षांपासून सुरू होती, पण पाकिस्तानने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. आता या कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

गेल्या काही वर्षांत दरबार साहेब गुरुद्वाराची अवस्थाही दयनीय झालेली होती. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या पुढाकारामुळे या गुरुद्वाराची डागडुजी पाकिस्तानकडून सुरू झाली. तसेच हा कॉरिडोर निर्माण करण्याचा पहिला प्रस्तावही अटलबिहारी वाजपेयी यांनीच मांडला होता. वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच पाकिस्तानने सन 2000 पासून हिंदुस्थानी शीख धर्मीयांना हा गुरुद्वारा भेटीसाठी खुला केला .

आता इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानने अचानकपणे या कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. 30 वर्षांपासून हिंदुस्थानच्या या मागणीवर पाकिस्तानला अचानक झालेली उपरती ही प्रश्नांकित आणि शंकास्पद आहे. किंबहुना या सर्वांमागे पाकिस्तानचा एक डाव आहे. तो समजून घ्यावा लागेलच, पण हिंदुस्थानने अत्यंत उत्तमरीत्या हे प्रकरण हाताळले हेदेखील या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. मागच्या वर्षी या कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री यांना आमंत्रण दिले होते, परंतु हिंदुस्थानने उत्तम राजनीतीचा नमुना दाखवला आणि यापैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. या कार्यक्रमासाठी हरसिमरन कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी असे दोन शीख धर्मीय शासकीय प्रतिनिधीच पाठवण्यात आले होते. थोडक्यात, हा शीख धर्मीयांचा धार्मिक सोहळा असल्याच्या दृष्टिकोनातून हिंदुस्थानने याकडे पाहिले.

गेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतो आहे. दोन वर्षांपूर्वी थायलंडमध्ये जगतारसिंग तारा या शीख दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. गुप्तहेर संघटनांकडून झालेल्या चौकशीमध्ये त्याने दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जगतारसिंगने दिलेल्या माहितीनुसार थायलंडमध्ये एक लष्करी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असून ते प्रामुख्याने शीख दहशतवाद्यांसाठी चालवले जात आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण केंद्र आयएसआयकडून संचलित केले जात आहे. तसेच ‘लश्कर-ए-तोयबा’, ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’, ‘दल खालसा’ या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’कडून केला जात आहे आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे. जगतारसिंग याने चौकशीदरम्यान लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असतुल्ला याच्याशी लाहोरमध्ये भेट झाल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर या दोघांनी मिळून जम्मू-कश्मीरच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्र आणण्याची योजना बनविल्याचे उघड झाले होते. त्यामुळे हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱया जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि खलिस्तानी दहशतवादी संघटनांना एकत्र आणून हिंदुस्थानात अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू असल्याचे उघड झाले होते.

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याकडून 20 मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती. या यादीमध्ये पाच शीख दहशतवाद्यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, जवळपास 170 शीख दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत आणि त्यांना आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ‘बब्बर खालसा’ या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश असून ते पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत. हिंदुस्थानने पाच शीख दहशतवाद्यांना हस्तांतरणाची मागणीही पाकिस्तानकडे केलेली आहे, परंतु पाकिस्तानने याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत.

13 ऑगस्ट 2013 रोजी हिंदुस्थानचे तत्कालीन गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी राज्यसभेमध्ये बोलताना यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानुसार काही खलिस्तानवादी दहशतवादी पाकिस्तानमध्ये असून ‘आयएसआय’कडून या खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल करीम टुंडा याला नेपाळच्या सीमेवर पकडण्यात आल्यानंतर त्यानेही आयएसआयच्या या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या षड्यंत्राला दुजोरा दिला होता. तसे पाहता आयएसआयचा हा प्रयत्न नवा नाही. 1980 च्या दशकात जनरल झिया उल हक हे पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते तेव्हापासूनच पाकिस्तानकडून खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली होती.

करतारपूरचा मुद्दा पुढे करण्यामागे पाकिस्तानकडे एक षड्यंत्र आहे. गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानवादी चळवळीला समर्थन देऊन हिंदुस्थानविरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ सातत्याने करत आहे. करतारपूरच्या भूमिपूजनावेळी तिथे मोठमोठे पोस्टर लावले गेले आणि त्यावर खलिस्तानवादी नेत्यांचे फोटो लावले गेले. यामध्ये पाकिस्तानात आश्रयाला असणाऱया खलिस्तानवाद्यांचा सर्वात मोठा नेता असलेल्या गोपाल चावलाचा फोटो होता. या उद्घाटन समारंभाला हा चावला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या बाजूला बसला होता. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करत होता. या गोपाल चावलाचे हाफिज सईदबरोबर अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आयएसआय, पाकिस्तानी लष्कर आणि खलिस्तानवादी यांच्यामध्ये हिंदुस्थानविरोधी कारस्थानांना सुरुवात झाली आहे. यावर्षी म्हणजे 2019 मध्ये गुरू नानकांची 550 वी जयंती आहे. यानिमित्ताने पाकिस्तानात मोठे शीख संमेलन भरवण्यात येणार आहे. हे संमेलन खलिस्तानवादी भरवत आहेत. याचे औचित्य साधून मोठय़ा प्रमाणावर शीख बांधवांनी यावे यासाठी या कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात आता शीख लोक पाकिस्तानात जातील. तेथे त्यांना खलिस्तानवादी चळवळीकडे कसे आकर्षित करायचे, त्यांचे समर्थन कसे मिळवायचे यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. खलिस्तानवाद्यांनी ‘जस्टीस फॉर शीख’ नावाची एक नवी चळवळ सुरू केली आहे. त्यांना यासाठी हिंदुस्थानातील शीख समुदायाचे समर्थन मिळवायचे आहे. त्यामुळे हे पाकिस्तानचे कूटकारस्थान आहे हे निर्विवाद आहे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत)

 

आपली प्रतिक्रिया द्या