कसारा रेल्वेसह महामार्गावरील घाटात दरडीचा पाऊस; आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य

शाम धुमाळ

दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री 11 वाजता मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. महाकाय दगड व मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केशव नाईक व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम या समाजिक संस्थेचे सद्यस्य शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, दत्ता वाताडे, महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे कर्मचारी घटनास्थली दाखल झाले.

दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना थांबवले आणि रस्यावरील लहान दगड बाजूला करून एक लेन संथ गतीने सुरु करण्यात आली. कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी केशव नाईक व महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल वालझडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), टोल कंपनी यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला.

तब्बल दोन तासानंतर संबंधितानी जेसीबी घटनास्थळी पाठवला. त्या दरम्यान रात्री 11 ते 1 या वेळात भर पावसात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहनांची वाहतूक बॅटऱ्यांच्या साहाय्याने एका लेनने संथ गतीने सुरु ठेवली होती. रात्री 1.40 दरम्यान संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पीक इन्फ्रा कंपनीचे कामगार आल्यानंतर मध्यरात्री पावणे तीन वाजता जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्यात येऊन सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटात काही झाडे व माती रत्यावर आली तर ओहळची वाडी जवळील वळनावर् काही दरडी कोसळल्या.

रविवारी रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावर दरड कोसळत असतानाच आज सकाळी मध्य रेल्वेच्या कसारा-इगतपुरी रेल्वे मार्गावर सकाळी 6 वाजता किलो मिटर क्रमांक 122/38 वर महाकाय दरडी, झाडे तसेच मातीचा ढिगारा रेल्वे ट्रॅकवर कोसळला. यामुळे मध्य रेल्वेची मुंबईहून नाशिक दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. रेल्वे ट्रॅक वरील मातीचा ढिगारा काढण्यास उशीर होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आले.

दैव बलवत्तर म्हणून…

दरम्यान रविवार असल्याने कसारा मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जेव्हा घाटात महाकाय दरड कोसळली त्या दरम्यान मुसळधार पाऊस होता. त्या मुळे अनेक लहान वाहने घाटाखाली थांबून होती. जर पावसाचा जोर नसता अन लहान वाहने सुरु असती तर या महाकाय दरडीखाली एखादे वाहन सापडले असते. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

kasara-railway-track

आपली प्रतिक्रिया द्या