कसारा रेल्वे स्थानकातील घटना, लोकलवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

मुंबईहून कसारा स्थानकात येत असलेल्या लोकलवर नजीकच्या डोंगरावरील दरड अचानक कोसळली. आज रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मोटरमनने अत्यंत सावधगिरी बाळगत ही लोकल कसारा स्थानकापर्यंत आणली. दरम्यान दरड कोसळल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आज रात्री नऊच्या सुमारास ट्रक बदलत असताना काही अंतरावर असलेली दरड अचानक लोकलवर कोसळली. दरडीमुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी बाळू जाधव व तुकाराम जाधव हे गंभीर जखमी झाले. या दरडीमुळे लोकललाही काही प्रमाणात धक्का बसला. गंभीर दुखापत झालेल्या जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीम कसाराचे सदस्य प्रमोद वारंगुसे यांनी सहप्रवाशांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानकात उतरवले.