महामार्गावरील कशेडी घाट या वर्षीही वाहनचालकांसाठी ठरणार डोकेदुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार करण्यात येत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी ते रायगड जिल्ह्यातील भोगाव बोगद्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या वर्षीही पावसाळ्यात नागमोडी वळणांचा अवघड कशेडी घाट वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

काही ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने रास्ता खणून ठेवण्यात आला आहे, तर काही ठिकाणी रास्ता खचणे, दरड कोसळणे असे प्रकार होणार असल्याने मुसळधार पावसात वाहन चालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा तालुक्यातील कशेडी घाट पावसाळ्यात नेहमीच वाहनचालकांना आव्हानात्मक ठरतो. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून हा घाटाची ओळख आहे. खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी येथे सुरु होऊन रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात संपणारा हा घाट 22.5 कि.मी. लांबीचा असून घाट तीव्र उतार, नागमोडी वळणाचा असल्याने अवजड वाहतुकीसाठी नेहमीची त्रासदायक ठरत आला आहे.

पावसाळ्यात वारंवार कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता या मुळे हा घाट ओलांडताना वाहन चालकांच्या कौशल्याची कसोटी लागते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून सुरु होऊन नागमोडी वळणे घेत खेड तालुक्यातील खवटी गावात संपणाऱ्या या घाटात वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. अनेक वाहने या घाटातून ये-जा करत असतात खेड तालुक्याच्या बाजूने घाट चढताना एका बाजूला उचं डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे घाट सुरु झाला की चालकांच्या पोटात गोळा येतो. त्यात एकाद्या अवघड वळणावर जराजरी लक्ष विचलित झाले की कपाळमोक्ष ठरलेलाच.

त्यातच रायगड जिल्ह्यातील भोगाव गावच्या हद्दीत 150 मीटर अंतराचा रस्ता खचला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील धोका आणखीनच वाढला आहे. जुलै 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धामणदेवी व भोगावच्या हद्दीत कोसळलेल्या दरडींमुळे हा मार्ग तब्बल 12 दिवस बंद होता. 2011 मध्येही ऐन गणेशोत्सवात 3 आणि 4 ऑगस्टला खेड तालुक्यातील हद्दीत येणाऱ्या घाटातील भागात तीन वेळा मोठ्या दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता. दरवर्षी रायगड जिल्ह्यातील धामणदेवी व भोगावच्या हद्दीत रस्ता वाहून जाणे, खचणे व दरडी कोसळणे हा प्रकार घडत असल्याने पावसाळ्यात जीव मुठीत धरून वाहनचालक प्रवास करावा लागतो.

पावसाळ्यादरम्यान घाटात उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घाटाची पाहणी केली असता भोगाव ते कशेडी दरेकरवाडी दरम्यानचा भाग हा आजही धोकादायक आहे. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी अन्यथा पावसाळ्यात घाटात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाड महामार्ग बांधकाम विभागाकडून भोगाव गावच्या हद्दीत खचणारा रस्ता दरवर्षी दुरुस्त करण्यात येतो, परंतु हा रस्ता पुन्हा पुन्हा खचतो. घाटातील अवघड व धोकादायक वळणावर अनेकदा अवजड वाहने अपघातग्रस्त होत असतात. अपघातानंतर हा महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यात कशेडी घाटात दाट धुके पसरते. यासाठी मार्गावरील दिशादर्शक फलक, सुचना फलक दुभाजक व साईडपट्टी, पांढरे पट्टे अशा प्रकारच्या वाहनचालकांना संभावित धोक्याची जाणीव करून देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. घाटातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशेडी बंगला येथे वाहतूक पोलिस चौकी असली तरी या शाखेकडे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.कशेडी घाटात रस्त्यावर रसायन वाहतूक करणारे अवजड टँकर, ट्रक, ट्रेलर यासारखी अवजड वाहने अपघातग्रस्त होऊन मध्यभागी किंवा डोंगरबाजूला कलंडल्याच्या घटना घडल्या आहेत.

अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी किमान पाच तासापेक्षा जास्त कालावधी लागतो. या दरम्यान मुंबई व गोवा त्या दिशेला पाचसहा किलोमीटर अंतरापर्यंत शेकडो वाहनांच्या रांगा लागून कित्येक तास, वाहने अडकून पडतात. अपघाताची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली तर अडकून पडलेल्या वाहनातील प्रवाशांना रात्री निर्जन ठिकाणी मदतही वेळेवर मिळत नाही. रस्त्यावरील कलंडलेले किंवा दरीत कोसळलेल्या वाहनाला उचलण्यासाठी क्रेन्स लागतात. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाची क्रेन आहे, मात्र ऑपरेटर नसल्याने गेली अनेक वर्षे ही क्रेन बंद आहे. त्यामुळे पोलिसांना मदतकार्यात, आपत्तीकाळात वाहतूक नियंत्रणात अडचणी निर्माण होतात.

कशेडी घाटाला पर्यायी ठरणाऱ्या महाड-राजेवाडी-विन्हेरे-नातूनगर या मार्गावरून कशेडी घाटातील वाहतूक बंद झाल्यास पर्यायी वाहतूक व्यवस्था केली जाते. 2005च्या अतिवृष्टीच्या वेळी कशेडी घाट कोसळल्यामुळे या मार्गाचे महत्त्व लक्षात आले होते. 2019मध्ये या मार्गावर ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत फाळकेवाडी जवळ भगदाड पडले होते. यामुळे कित्येक दिवस या पर्यायी मार्गावरील वाहतूक बंद होती. कशेडी घाटाला पर्यायी व्यवस्था म्हणून पाहिले जात असले तरी हा राज्यमार्ग असल्याने कशेडीघाटात वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाढणाऱ्या पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक आहे.