कश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्राची पुन्हा लुडबुड; मध्यस्थीचा प्रस्ताव हिंदुस्थानने धुडकावला

480

कश्मीरवरून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या वादात संयुक्त राष्ट्राने उडी घेतली आहे. कश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास संयुक्त राष्ट्राने तयारी दर्शवली आहे. मात्र हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्राचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव एण्टोनियो गुतरेस यांनी सोमवारी जम्मू-कश्मीरच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली.

गुतरेस सध्या चार दिवसांच्या पाकिस्तानच्या दौऱयावर आहेत. यावेळी त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव कमी करण्याच्या हेतूने मध्यस्थीची इच्छा व्यक्त केली. जर दोन्ही देशांची संमती असेल तर संयुक्त राष्ट्र या प्रश्नात हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, दोघांत तिसरा नकोच, असे स्पष्टपणे सांगत गुतरेस यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. गुतरेस यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कश्मीर प्रश्नावर भाष्य केले.

हिंदुस्थान आपल्या भूमिकेवर ठाम

कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मध्यस्थीची तयारी दर्शवली असली तरी हिंदुस्थान आपल्या भूमिकेत बदल करणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केले. त्यांनी गुतरेस यांचा मध्यस्थतेचा प्रस्ताव फेटाळला. हिंदुस्थानच्या भूमिकेत कोणताही बदल नाही. पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेला जम्मू-कश्मीरचा भाग रिकामा करण्याबाबत संयुक्त राष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे रवीश कुमार यांनी सुचवले.

दोन्ही देशांनी संयम बाळगावा!

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सैन्य कारवाई तसेच भडकावू विधाने करणे सोडावे. संघर्ष आणखी चिघळू नये या दृष्टिकोनातून दोन्ही देशांनी संयम बाळगावा, असा सल्लाही गुतरेस यांनी दिला आहे. जम्मू-कश्मीरची परिस्थिती आणि नियंत्रण रेषेवरील तणावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या