
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी पुणे महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर केले. मात्र या अंदाजपत्रकात वर्षोनुवर्षे रखडलेल्या कात्रज – कोंढवा रस्ता, शिवणे खराडी रस्ता, चोवीस तास पाणी पुरवठा योजना यासह पुन्हा पाच वर्षांनी बालगंधर्व पुनर्विकासाची घोषणा केली आहे. नव्या योजनांपेक्षा यापूर्वीच जाहीर झालेल्या आणि अद्याप अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांचा समावेश झाला आहे.
शहरातील महत्त्वाचे समजले जाणारे शिवणे-खराडी रस्ता आणि कात्रज-कोंढवा रस्ता या दोन्ही मार्गांचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. या रस्त्यांवरील कामे संथ गतीने सुरू असूनही त्यांचा पुन्हा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. भाजपने यापूर्वी जाहीर केलेली बालगंधर्व पुनर्विकास योजना गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आहे. ही योजना पूर्णत्वास न जाता पुन्हा नव्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, सुमारे आठ ते दहा वर्षापुर्वी सारसबाग ते बालभवन दरम्यान प्रस्तावित रोपवे योजना जाहीर केली. आतापर्यंत या योजनेचा भाजपला विसर पडला होता. आता या यात बदल करण्यात आला आहे. आता या योजनेचा मार्ग बदलून सारसबाग ते पर्वती रोपवे असा नवा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. शहरासाठी महत्त्वाची मानली जाणारी चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुमारे आठ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. मात्र आजतागायत ही योजना पूर्ण झालेली नाही. तरीदेखील या योजनेचा पुन्हा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. एकूणच नवीन प्रकल्पांच्या घोषणांबरोबर अपूर्ण आणि रखडलेल्या योजनांचा पुनरुच्चार करण्यात आल्याने हे अंदाजपत्रक जुन्याच योजनांचा पाढा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केवळ घोषणा आणि आश्वासनांमधून बाहेर येऊन प्रत्यक्षात कामे पूर्ण होणार का असा सवाल पुणेकरांना पडला आहे.
यावर स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, पाणी पुरवठा योजना, कात्रज कोंढवा रस्त्याचे काम अिंतम टप्प्यात आले आहेत. इतर सर्व योजना वेळेत लवकर पुर्ण करू.

























































