
गेल्या काही वर्षांपासून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. प्राणिसंग्रहालयाच्या तिकिट खिडकीवर प्रचंड गर्दी होत असते. पर्यटकांची प्रवेशद्वार गर्दी होत असल्याने रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास आता कमी होणार असून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तासनतास् रांगेत उभे राहून तिकिट काढण्याची आता गरज भासणार नाही. कारण प्राणी संग्रहालयात आता दिवाळीपासून ऑनलाईन तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी खास संकेतस्थळ बनविण्यात आले आहे.
महापालिकेचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र अर्थात कात्रज झू पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाघ, सिंह, चित्ता, कोल्हा पासून ते सर्व प्रकारचे पक्षी, प्राणी, साप या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात. हे पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून लोक येत असतात. यात शाळांच्या सहलीचे प्रमाण देखील असते. शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी झू मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जवळपास १० हजार नागरिक एका दिवशी भेट देतात. महापालिकेने तिकिटाचे काउंटर देखील वाढवले होते. तरीही नागरिकांना तिकिटासाठी बराच काळ रांगेत उभे राहावे लागते. याबाबत तक्रारी देखील येत होत्या. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पुढाकार घेत तिकीटाची प्रणाली ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वतंत्र पोर्टल चे काम पूर्ण करण्यात आले असून त्या पोर्टलचे उदघाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते झाले. ही प्रणाली ऑनलाईन झाली असली तरी तिकिटाचे दर मात्र पाहिल्यासारखेच असणार आहेत. त्यात कुठलाही बदल नाही. प्रौढ व्यक्तींना 40 रुपये, मुलांना 10 रुपये, परदेशी नागरिकांना 100 रुपये असे तिकिटाचे दर आहेत. तर व्हीडीओ कॅमेरासाठी 200 आणि स्टील कॅमेरा साठी 50 रुपये असा दर आहे.
तिकिटासाठी इथे करा नोंदणी
पर्यटकांना संकेतस्थळावर जाऊन तिथे तिकिट बूक करून नेट बँकिंग किंवा यूपीआय चा पर्याय निवडून पेमेंट करता येणार आहे. संकेतस्थळावर प्राणीसंग्रहालयाची संपूर्ण माहिती दिली आहे. विविध विभाग केले असून कोणते प्राणी आहेत, भविष्यातील काही योजना असतील तर त्यांची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटकांनी खालील https://zooticket.pmc.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन तिकीट बूक करता येऊ शकते. प्राणिसंग्रहालय दर बुधवारी बंद असणार आहे आणि अपंग व्यक्तींना मोफत प्रवेश असणार आहे.




























































