केदार, धोनीचा धमाका, हिंदुस्थानचा पहिल्या वन डेत शानदार विजय

32

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हिंदुस्थानची अवस्था धावांचा पाठलाग करताना 4 बाद 99… ट्वेण्टी-20 मालिका गमावणाऱ्या टीम इंडियासमोर आणखी एक संकट… हिंदुस्थानचा पाय खोलात असताना खेळपट्टीवर महाराष्ट्राचा केदार जाधव व अनुभवी महेंद्रसिंह धोनी ही जोडी आली आणि त्यांनी सामन्याचा नूर बदलून टाकला. दोघांनी 141 धावांची अभेद्य भागीदारी रचताना हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

गोलंदाजीत चमक दाखवणाऱया केदार जाधवने 87 चेंडूंत एक षटकार व नऊ चौकारांसह नाबाद 81 धावांची संस्मरणीय खेळी साकारली, तर महेंद्रसिंह धोनीने 72 चेंडूंत एक षटकार व सहा चौकारांसह नाबाद 59 धावांची खेळी केली. हिंदुस्थानने हैदराबाद वन डेत ऑस्ट्रेलियाला हरवत पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मराठमोळ्या केदार जाधवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

तीन फलंदाज झटपट बाद
हिंदुस्थानचा संघ सुस्थितीत आहे असे वाटत असतानाच नॅथन कुल्टर नाईल व ऍडम झाम्पा यांनी कांगारूंसाठी झोकात पुनरागमन केले. ऍडम झाम्पाने विराट कोहलीला 44 धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर नॅथन कुल्टर नाईलने रोहित शर्माला 37 धावांवर (66 चेंडू) ऍरोन फिंचकरवी झेलबाद केले. रोहित शर्माने या लढतीत संथ फलंदाजी केली. ऍडम झाम्पाने अंबाती रायुडूलाही 13 धावांवर बाद करीत यजमानांना बॅकफूटवर ढकलून दिले. त्यामुळे हिंदुस्थानची अवस्था 1 बाद 80 वरून 4 बाद 99 धावा अशी झाली.

रोहित-विराटच्या 76 धावा
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 237 धावांचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थानला पहिला धक्का अवघ्या चार धावांवरच बसला. नॅथन कुल्टर नाईलने शिखर धवनला शून्यावर बाद केले. मात्र रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली या जोडीने दुसऱया विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करताना हिंदुस्थानचा डाव सावरला.

ख्वाजा, स्टोयनीसची 87 धावांची भागीदारी
याआधी जसप्रीत बुमराहने ऍरोन फिंचला शून्यावरच बाद करीत कांगारूंना मोठा धक्का दिला. पण उस्मान ख्वाजा व मार्कस स्टोयनीस या जोडीने दुसऱया विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करीत पाहुण्यांना संकटातून बाहेर काढले. केदार जाधवच्या गोलंदाजीवर मार्कस स्टोयनीस 37 धावांवर विराट कोहलीकरवी झेलबाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाने आपली विकेट गमावली. उस्मान ख्वाजाने 50 धावांची खेळी साकारली. नॅथन कुल्टर नाईल व ऍलेक्स कॅरी या जोडीने 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

शमी आला धावून
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पीटर हॅण्डस्कोम्ब महेंद्रसिंह धोनीकरवी यष्टिचीत झाला. त्याला 19 धावाच करता आल्या. तो बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेल व ऍश्टन टर्नर या जोडीने 36 धावांची भागीदारी रचली. यावेळी ऑस्ट्रेलिया पुढे वाटचाल करीत असतानाच मोहम्मद शमी हिंदुस्थानसाठी धावून आला. त्याने आधी ऍश्टन टर्नरला 21 धावांवर आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला 40 धावांवर बाद करीत मोठा धक्का दिला.

आपली प्रतिक्रिया द्या