केदारनाथ-बद्रीनाथ धाम विशेष पूजेचे शुल्क वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये आगामी चारधाम यात्रेच्या आधी बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धाममध्ये विशेष पूजा शुल्क वाढवण्याची तयारी केली जात आहे. यासंबंधी बदी-केदार समिती मंदिर समिती (बीकेटीसी) च्या बोर्डाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असून बैठकीतील चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यावर्षी चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्वात आधी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडतील. त्यानंतर 22 एप्रिलला केदारनाथ आणि 24 एप्रिलला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत.

बद्रीनाथ आणि केदारनाथ धामच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक या ठिकाण पोहोचतात. सामान्य दर्शनासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. परंतु, जर भाविकांना विशेष पूजा करायची असेल तर त्यासाठी शुल्क आकारले जाते. जे बीकेटीसीकडून आधीच ठरवलेले आहे. परंतु आता या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. केदारनाथ धाममध्ये रुद्राभिषेक पूजासाठी पाच भाविकांसाठी 7200 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. अभिषेक पूजासाठी 9500 रुपये, छोटय़ा रुद्राभिषेक पूजेसाठी 6100 रुपये, षोडशोपचार पूजेसाठी 5500 रुपये, अष्टोपचार पूजासाठी पाच भाविक असतील तर 950 रुपये आणि संपूर्ण दिवसभर पूजा करावयाची असेल तर 28,600 रुपये आकारले जाते. याचप्रमाणे बद्रीनाथ धाममध्ये महाभिषेक पूजासाठी प्रति भाविक 4700 रुपये अभिषेक पूजेसाठी 4500 रुपये, संपूर्ण दिवस पूजा असेल तर 12 हजार रुपये आणि श्रीमद्भागवत पाठ करायचे असेल तर 51 हजार रुपये शुल्क आकारले जाते.