
यंदा मान्सूनच्या हंगामात सरासरीपेक्षा अधिक 106 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे चार टक्के कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. तर यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातल्याने संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला अधिक फटका बसणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरपर्यंत ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली.
यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनाने दूरदृश्य प्रणालीद्वारे एकत्र येऊन पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी उपाययोजना व समन्वय, यावर सखोल चर्चा केली. या बैठकीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजापूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता यांच्यासह जलसंपदा विभागातील संबंधित जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.
पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन, यासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती तसेच आंतरराज्य समन्वय या प्रमुख मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची आज बैठक
या बैठकीद्वारे दोन्ही राज्यांतील प्रशासनाने पूरपरिस्थिती रोखण्यासाठी संयुक्तपणे आणि जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेषतः गेल्या काही वर्षांत आलेल्या पूरपरिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी अधिक काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी, यावर भर देण्यात येणार आहे. संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक दि.29 मे रोजी घेण्यात येणार आहे.
- बैठकीतील ठळक मुद्दे
अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल. - पाणीपातळीची देवाणघेवाण व अन्य उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधी वारणा, कोयना धरण व राजापूर बंधाऱ्याच्या ठिकाणी, तर सांगली पाटबंधारेचे सेवानिवृत्त अधिकारी अलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी म्हणून नेमावेत, असा निर्णय बैठकीत झाला.
- पूरपरिस्थिती ओढवल्यास चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करतील.
- स्थानिक यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि जलसंपदा विभाग यांच्यातील समन्वय अधिक दृढ केला जाणार.
- संभाव्य पूरस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी इशाराव्यवस्था (Alert System) अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.
- नदीकाठच्या गावांची विशेष काळजी घेणार तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाली, तर पूरग्रस्त गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी केली जाणार आहे.




























































