केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये तुंबळ हाणामारी

सामना ऑनलाईन। कोल्लम

केरळच्या कोल्लम जिह्यामध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ)आणि संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीए) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठय़ा-काठय़ांनी मारहाण केली आहे. केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यातील मतदान मंगळकारी (23 एप्रिल) पार पडणार आहे. या टप्प्यासाठी रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सारेच पक्ष शक्तिप्रदर्शन करत होते. केरळमध्येदेखील प्रचार सुरू होता. कोल्लम जिह्यातील पुयापल्ली येथे डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीए) या आघाडीतील पक्षाचे कार्यकर्ते रोड शो दरम्यान एकमेकांसमोर आले.

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. थोडय़ा वेळाने या वादाचे रूपांतर हे हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड-शो दरम्यान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील झेंडय़ाच्या काठीनेच एकमेकांना मारण्यास सुरुकात केली. पोलिसांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.