केरळने दिला डाव्यांना ‘काडीचा आधार’!

ज्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी एकेकाळी निर्विवाद व निरंकुश सत्ता गाजवली तिथे सध्या ‘डाव्यां’ना जाड भिंगाच्या चष्म्याने शोधावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे केरळने गटांगळ्या खाणाऱया डाव्यांना थिरुवअनंतपुरमच्या किनाऱयावर सुखरूप आणून पोहोचवले आहे. दर पाच वर्षाला सत्तांतराची केरळची परंपरा तेथील सुज्ञ व सुशिक्षित जनतेने पहिल्यांदाच 40 वर्षांत मोडीत काढली. त्यामुळे किमान डावे अस्तित्वात तरी राहिले!

तिवारींनी तृणमूलकडून शिबरपूरमधून तर डिंडा यांनी भाजपकडून मोयनामधून दणदणीत विजय मिळवला. अर्थात काँग्रेस अंतर्गत गटबाजी तेथे सुरुवातीपासूनच जोरात झाली. त्यात पी.सी.चाकोंनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला. सध्या दिल्ली दरबारात वजन वाढलेल्या के. सी. वेणुगोपाल यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी उदारहस्ते बहाल केल्या. त्यांना ‘पाडण्याचा कार्यक्रम’ काँग्रेसी परंपरेनुसार रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष रामचंद्रन यांच्या गटाने इमानेइतबारे केला. काँग्रेस अंतर्गत लाथाळ्या इतक्या मोठय़ा होत्या की, त्यामुळे डाव्यांना मैदान मारण्यात फार हातपाय मारावे लागले नाहीत.

केरळमध्ये डाव्यांचा डंका वाजला. त्याला कारणीभूत ठरली ती विजयन सरकारची लोकाभिमुख इमेज. एकीकडे सोन्याच्या घोटाळ्यासह भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमुळे डाव्यांच्या तथाकथित इमेजचा फजितवडा होत असतानाही डावीं मंडळी तेथे जिंकली याची काही कारणे आहेत. मुख्य म्हणजे दोन टर्मपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या आमदारांना विजयन यांनी सरळ घरचा रस्ता दाखवून ‘ऍण्टी इन्कम्बन्सी’ची धार बोथट केली. गरीब जनतेला लुभावणाऱया काही योजनांचा पाऊस पाडून मतदान करणाऱया वर्गात ‘फीलगुड’ निर्माण केले. कोरोनाची स्थिती तिथील महिला आरोग्यमंत्री शैलजा यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली. कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्यता लक्षात घेऊन शैलजा यांनी त्या राज्यात प्रभावी उपाययोजना राबविल्या. परिणामी केरळला कोरोनाचा तडाखा तुलनेने कमी बसला. थेट परदेशातून येणाऱया पर्यटक व प्रवाशांची संख्या केरळात मोठय़ा प्रमाणावर आहे. तरीही कोरोनाला चांगला अटकाव घातला गेला. त्याचा चांगला परिणाम जनमानसावर झाला. गंमतीचा भाग म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याच केरळने काँग्रेसला मोठा हात दिला होता. मात्र दोनेक वर्षांत राज्यातले चित्र पालटून टाकण्यात विजयन यशस्वी ठरले. कम्युनिस्टांना सलग दोनदा विजय मिळवून देणारे नेते म्हणून त्यांची केरळच्या राजकीय इतिहासात नोंद झाली. जगभरातून डाव्यांची विचारसरणी आणि सद्दी संपत आहे. प. बंगालमध्ये डाव्यांचे पानिपत झाल्यानंतर केरळने काडीचा आधार देऊन डाव्यांना ‘जीवदान’ दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या